अंधार माझा सोबती

232

<< टिवल्या बावल्या>>     << शिरीष कणेकर >>

विलास सारंग यांचं निधन झालं. मागेच. लेट मी बी ब्रुटली ऑनेस्ट. मी त्यांचा एकही शब्द वाचलेला नाही. यावर काय बोलायचं ते नंतर बोलूया. नाही बोललं तरी चालेल. मी कोणाचं, किती वाचलंय यावर त्या लेखकाची योग्यता ठरतं नसते. माझ्या मताला इतर कोणी  सोडाच, पण मी स्वत:ही किंमत देत नाही. मला वाटतं ते व वाटतं तसं मी लिहीत असतो व मग चोच मिटून कोपऱ्यात गपगुमान पडून राहतो. आम्हा सगळ्यांना जोखायला, तोलायला, मापायला वाचकदेव बसलेला आहे. ते त्यांचं काम करतील, आपण आपलं काम करावं. त्यातून मी केवळ स्वानंदासाठी लिहितो. वाचकांना आनंद देऊ शकलो तर आनंदच आहे, पण नाही देऊ शकलो तरी त्यामुळे माझ्या मनात कारंज्यासारखा थुईथुई नाचणारा आनंद कमी होत नाही. पण अमुक एकानं माझं लेखन आवर्जून वाचलंच पाहिजे अशी ओढ माझ्या अंतर्मनाला लागलेली नसते. कोण असतं असं एक? अण्णा होते तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तेव्हाच सगळंच वेगळं होतं. मी बऱ्यापैकी माणसात होतो. जीवनाची दोर पकडून होतो. भवसागर तरून जाण्याची स्वप्ने बघत होतो.  आपण चारचौघांसारखे ‘नॉर्मल’ आहोत असं स्वत:ला भासवत होतो.

अण्णांच्या पश्चात पुस्तक त्यांना अर्पण करताना मी लिहिले होते – ‘अण्णा, तुम्ही असतात तर म्हणाला असतात, मिस्टर शिरीष, तुम्ही एवढं लिहिता, पण ते कोणी वाचतं का?’ मी म्हणालो असतो, ‘तुम्ही वाचत नाही एवढं मला माहित्येय. इतर कोणी वाचलं काय अन् नाही वाचलं काय, मिस्टर शिरीषना काही फरक पडत नाही.’

बघा, विलास सारंगांपासून सुरू झालो होतो आणि कुठं भरकटलो. ‘मी माझं मला’पेक्षा ‘भरकटलेला’ हे नाव माझ्या आत्मचरित्राला जास्त शोभलं नसतं का?

जसजसा काळ जातोय तसतसा वास्तवापासून मी दूर चाललोय अशी माझी भावना आहे. राग-लोभ सगळंच निरर्थक वाटायला लागलंय. पण तरीही त्यांना जिवाच्या आकांतानं पकडून ठेवायचं कारण ते जीवनाशी जोडलेले ठेवतात. अलीकडे ‘हिंदी चित्रपटसंगीताचा चालताबोलता ज्ञानकोष’ किंवा ‘क्रिकेटचा गड्डा’ असा कोणी उल्लेख केला की मला शरमल्यासारखं होतं. कसलं चित्रपट संगीत अन् असलं क्रिकेट… लागले नेत्र ते पैलतीरी…

अण्णा कुठं असतील? काय करत असतील? बरोब्बर चार वाजता त्यांना कोण चहा देत असेल? ‘अण्णा चहा’ असं म्हणून पेपर तोंडावर घेऊन झोपलेल्या अण्णांना कोण उठवत असेल? त्यांच्यासाठी वडीचं सांबारं कोण करीत असेल? त्यांच्यानंतर मला ‘मिस्टर शिरीष’ असं गेल्या पन्नास वर्षात कोणी संबोधलेलं नाही हे त्यांना माहीत असेल का? आई कशी आहे? जिचा चेहरा आठवत नाही तिची चौकशी तरी काय करू?… ‘ओ दूरके मुसाफिर हमको भी साथ ले ले, हम रहे गये अकेले…’ जिथं माझी माणसं आहेत तिथंच जाऊन मी रहायला नको का? मी इथं काय करतोय? कशासाठी वेळ दवडतोय?

अनुदिनी मला साहिर लुधियानीचे शब्द नव्यानं कळतायत, नव्यानं पटतायत. तो म्हणाला होता –

‘कौन रोता है किसी औरके खातिर ऐ दोस्त

सबको अपनीही किसी बातपे रोना आया’

बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, ‘माशाचे अश्रू दिसत नाहीत.’ विनोदी लेखकाला तर अश्रू ढाळण्याचा अधिकारच नसतो. हसवणाऱ्यांनं स्वत:च रडून कसं चालेल? तुम्हाला काय धाड भरल्येय रडायला? हसवा-हसवा. हसवतो ना; जरा डोळे पुसू द्या. स्वत: मोठे डॉक्टर असून अण्णा मला म्हणाले होते, ”मिस्टर शिरीष, आता माझा काही भरवसा नाही.” अण्णांच्या नंतर भरवसा ठेवावा असं गेल्या पन्नास वर्षात मला कोणी भेटलंच नाही. नुसताच जगलो. अधांतरी. मेलो नाही म्हणून जगलो. जगलो म्हणून मेलो नाही असं म्हणायचं. अलीकडे मी आरशात बघायचं टाळतो. मला आरशात माझंच मढं दिसतं.

या सगळ्यांचा दिवंगत लेखक विलास सारंग यांच्याशी काय संबंध? इतकं असंबद्ध कधीपासून लिहायला लागलो मी? मी इतरांना बोलतो, पण माझंच डोकं सरकलेलं नसेल ना? मला अण्णांची इतकी आठवण का येते? व्हाय कान्ट आय अलाऊ हिज सोल टु रेस्ट इन पीस? त्यांना जाऊन पाच तपं लोटल्यावरही मी त्यांचा छळ चालूच ठेवलाय का? अशानं मी नरकात जाईन आणि मग माझी अण्णांशी कधीही भेट होणार नाही. निदान तेवढ्यासाठी तरी मी पुण्यसंचय करायला हवा होता. आता उशीर झाला. सबकुछ लुटाके होशमे आये तो क्या किया?

मला बसल्या जागेवरून दिसतंय. अंधार एखाद्या श्वापदाप्रमाणे सावकाश सरपटत माझ्या खोलीत शिरतोय. बाल्कनीचं दार लावून घेतलं तरी तो आत येतोच. दरवाजाच्या फटीतून येत असेल पण येतो नक्की. हळूहळू तो मला चहूबाजूंनी घेरणार व मग गिळून टाकणार. मला वेगळं अस्तित्वच उरणार नाही. मी त्या अंधारात मिसळून जाणार. मी अंधाराचा एक भाग होणार. मग अंधार आणि मी मिळून आणखी एखाद्या जीवनात पसरणार. त्यालाही अंध:कारमय करून टाकणार. त्यालाही गिळून टाकणार. त्यालाही आमच्यात सामावून घेणार. हे चालूच राहणार जगाच्या अंतापर्यंत. सुरुवात माझ्यापासून होत्येय. मी माझ्या खुर्चीत बसलोय व आत येणारा अमंगल अंधार डोळे फाडफाडून बघतोय. डोळ्यांवाटेच तो माझ्या देहात शिरणार. आधी मेंदूवर हल्ला चढविणार व मग एकेक करून सर्व गात्रे काबीज करणार.

हे असं माझंच होतंय की सगळ्यांचंच होतं असतं? पण कोणी असं बोललेलं स्मरत नाही. माझंच एकट्याचं असं होत असावं. आय अॅम द चोझन वन!…

…विलास सारंगांचं एखादं पुस्तकं वाचायला हवं. मी काही उपकार नाही करीत त्यांच्यावर. त्यांचं वाचून आता या स्टेजला तरी मनाची प्रगल्भता वाढत्येत का पाहू. की ती वाढू नये म्हणून मी माझ्या रिंगणात धावत रहातो? काही कळेनासं झालंय. डोक्यात सगळा

गोंधळ माजलाय. अंधार माझ्या दिशेनं सरपटतोय…
  

 

आपली प्रतिक्रिया द्या