सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला आजपासून पुन्हा सुरूवात

46

 

सामना ऑनलाईन,आळंदी

नाशिक जिल्ह्यातील सप्तश्रृंगी देवीचं दर्शन काही काळासाठी बंद करण्यात आलं होतं. रविवार म्हणजेच २५ जूनपासून दर्शन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सप्तश्रृंगी गडावरील श्री भगवती मंदिरावरील डोंगरावर दरड प्रतिबंधक उपाययोजना केली जात होती. या कामासाठी देवीचं दर्शन काही काळासाठी बंद ठेवण्यात आलं होतं. रविवारपासून देवीचं दर्शन पुन्हा सुरू करत असल्याची माहिती श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगडचे व्यवस्थापक सुदर्शनजी दहातोंडे यांनी दिली.

श्री भगवती मंदिरावरील डोंगराला दरड प्रतिबंधक उपाय योजनेअंतर्गत संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या आहेत. या जाळ्यांवर पडलेले दगड हटवण्याचं काम १२ जूनपासून सुरू करण्यात आलं होतं. या कामासाठी २१ ते २७ जूनपर्यंत दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय आधी प्रशासनाने घेतला होता. मात्र हे काम वेळेत पूर्ण झाल्याने २५ तारखेपासूनच दर्शन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पहाटे साडेपाच ते रात्री साडेनऊ या वेळेमध्ये देवीचे दर्शन घेता येणार असल्याची माहिती दहातोंडे यांनी दिली आहे. ही माहिती कळताच भाविक आनंदीत झाले असून रविवारी पुन्हा एकदा देवीच्या दर्शनासाठी सप्तश्रृंग गड भाविकांनी फुलून जाण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या