अंगारकी: सिद्धीविनायक दर्शनासाठी विशेष व्यवस्था

मुंबईः २०१५ नंतर यंदा अंगारकीचा योग आला असून तब्बल २० लाखांपेक्षा जास्त भाविक श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने जय्यत तयारी केली आहे. दरवर्षी १६ ते १८ लाख भाविक येतात, मात्र यंदा तीन अंगारकी असून उद्या पहिलीच अंगारकी असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी उसळण्याची शक्यता श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासने व्यक्त केली आहे.

नर्दुल्ला टँक मैदानात काही भागांत मेट्रोचे काम सुरू असल्याने या मैदानात १८ हजार चौरस फुटांचा मंडप घालून पुरुषांसाठी रांगेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तर बाजूलाच असलेल्या राऊळ मैदानात १० हजार चौरस फुटांचा मंडप घालून या ठिकाणी महिलांसाठी रांगेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दोन्ही मंडपांत चहा, पिण्याचे पाणी, ८ मोबाईल टॉयलेट, चहा आणि बिस्किटांचे वाटप, पंखा, लाइट, एलईडी टीव्हीवर सिद्धिविनायकाचे लाइव्ह दर्शन, आरोग्यसेवा अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी दिली. अनिरुद्धबापूंचे एक हजार स्वयंसेवक, इतर संस्थांचे एक हजार स्वयंसेवक, मंदिराचे ३०० कर्मचारी, महापालिकेचे ४०० कर्मचारी, फायरब्रिगेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मंडपात १५९ सीसीटीव्ही, ७४ वॉकीटॉकी, हॅण्ड मेटल डिटेक्टर, डोअर मेटल डिटेक्टर सज्ज ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, यंदा नारळ, थाळी घेऊन येऊ नये. केवळ एक फूल घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले आहे. जर कुणी नारळ, थाळी आणि हार घेऊन आलेच तर प्रवेशद्वारावर ते ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे दर्शन लवकर होऊन पटापट रांग पुढे सरकेल असे श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष नरेंद्र राणे यांनी सांगितले.

-सोमवारी मध्यरात्री दीड वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात होईल.

-दर्शनासाठी ३ रांगा बनवण्यात येणार असून पहिली रांग ही मुखदर्शनासाठी दुसरी महिलांसाठी आणि तिसरी रांग ही पुरूषांसाठी.

-पहाटे सव्वातीन ते ३ वाजून ५० मिनिटांपर्यंत आरतीसाठी दर्शन बंद राहील.

-३ वाजून ५० मिनिटांपासून संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत दर्शन सुरू राहील.

-पुन्हा संध्याकाळी साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत दर्शन बाहेरून सुरू राहील.

-रात्री साडेनऊ ते १२ वाजेपर्यंत पुन्हा गाभाऱयातून आणि मुखदर्शन सुरू राहील.

-यंदा १४ फेब्रुवारी, ३ जून आणि ७ नोव्हेंबर अशा तीन अंगारकींचा योग आहे.

-गेल्या वर्षी एकही अंगारकी नव्हती.

-२०१५ मध्ये केवळ अंगारकीचा एकच योग होता.

…………..

अ. १३ फेब्रुवारीला मध्यरात्री १.३० मिनिटांपासून तीनही रांगांमधून दर्शनाला सुरुवात होणार आहे. महिला आणि पुरूषांसाठी मुखदर्शनाची सामाईक रांग असणार आहे ही रांग आगर बाजार ते सिद्धी प्रवेशद्वार या दरम्यान उभारण्यात येणाऱ्या रेलिंगमधून मंदिराच्या प्रवेशद्वारे क्रमांक १ मधून जाणार आहे.

ब. पुरूष भाविकांसाठी लावण्यात येणारी रांग महाराष्ट्र हायस्कूलच्या समोरील पदपथावरून सिल्व्हर अपार्टमेंट, जयभारत सोसायटी,रचना संसद ते रवींद्र नाट्यमंदिरच्या पदपथावरून नर्दुल्ला टँक मैदानातील मंडपातून १३ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १.३० मिनिटांनी साने गुरूजी उद्यानामार्गे मंदिराच्या प्रवेशद्वार ५ समोरच्या उद्यान दरवाजाच्या एका मार्गिकेतून प्रवेशद्वार क्रमांक ४ द्वारे गाभाऱ्यात नेण्यात येणार आहे.

क. महिला भाविकांसाठीची रांग दत्ता राऊळ मैदानात उभारण्यात येणाऱ्या मंडपातून ठाकूरवाडी कॉन्व्हेंट शाळेच्या पदपथावर बांधण्यात आलेल्या बांबूच्या रेलिंगमधून रिद्धी प्रवेशद्वार, मंदिर प्रवेशद्वार क्रमांक.६, प्रतिक्षालय इमारतीतील रेलिंगमधून प्रवेशद्वारे क्रमांक ७ मार्गे श्रींच्या गाभाऱ्यात नेण्यात येणार आहे.

ड. मंदिर प्रशासनाने भाविकांना दर्शनासाठी येताना मौल्यवान वस्तू,पर्स,पूजा-प्रसादाची थाळी या वस्तू आणू नयेत अशा सूचना केल्या आहेत. तसेच लॅपटॉप,कॅमेरे तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू आणू नयेत अशाही सूचना केल्या आहेत. फराळासाठी धातूंचे डबे आणण्यापेक्षा प्लॅस्टीकचे डबे आणावेत असंही मंदिर प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे.2

आपली प्रतिक्रिया द्या