दर्शन सोलंकी आत्महत्या प्रकरण ; तपासात जातीभेदाच्या पुराव्यांकडे दुर्लक्ष.. कुटुंबीयांचा आरोप

आयआयटी मुंबईत बी.टेकच्या पहिल्या वर्षाला शिकणारा विद्यार्थी दर्शन सोलंकीने 12 फेब्रुवारी आत्महत्या केली होती. आयआयटी मुंबईत दर्शनला जातीय भेदभावाचा सामना करावा लागला. दर्शनसोबत शिकणाऱया काही विद्यार्थ्यांच्या सततच्या छळाला पंटाळून दर्शनने टोकाचे पाऊल उचलले असा आरोप दर्शनच्या कुटुंबीयांनी केला आहे. तसेच याप्रकरणी सुरू असलेल्या पोलीस तपासात जातीभेदाच्या पुराव्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचेही सोलंकी कुटुंबाचे म्हणणे आहे.

पवई पोलिसांनी सुरुवातीला याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आणि त्यानुसार तपास सुरू केला. मात्र वाढत्या सार्वजनिक दबावानंतर आणि खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची मागणी केल्यानंतर राज्य सरकारने तीन सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली. दर्शनच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दर्शनला जातीमुळे त्रास सहन करावा लागत असल्याचे ठामपणे सांगितले आहे, तसेच रूममेटकडून होणाऱया त्रासामुळे दर्शनला हॉस्टेलमधील खोली बदलायची होती, असेही स्पष्ट केले आहे. ही सर्व माहिती पोलिसांना देऊनही पोलीस तपासात अनेक पुराव्यांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सोलंकी कुटुंबीयांनी केला आहे.

जेईई रँकबाबत दर्शनला होती भीती

इतर विद्यार्थ्यांना आपल्या जेईई रँक तसेच आपण राखीव श्रेणीतील असल्याचे समजल्यावर इतर विद्यार्थी आपला द्वेष करतील अशी भीती दर्शनला सतावत होती. दर्शनच्या आयआयटी मुंबईतील अनुभवानुसार तो राखीव श्रेणीचा विद्यार्थी असल्याचे समजल्यानंतर लोकांनी त्याला जातीमुळे टोमणे मारले असेही सोलंकी कुटुंबीयांचे म्हणणे आहे. आयआयटीत दर्शनला जातीय भेदभावाचा सामना करावा लागला हे यापूर्वीच पोलिसांना सांगितले आहे. अनुसूचित जातीतील दर्शनच्या इतर वर्गमित्रांनी आयआयटी मुंबईने नेमलेल्या समितीला दर्शन त्याच्या जातीबद्दल संवेदनशील असल्याची व त्याला होणाऱया त्रासाची कल्पना दिली आहे, हेदेखील दर्शनच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले.

दर्शनच्या आत्महत्येप्रकरणी जातीभेदाच्या पुराव्याकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच तपासाबाबत आम्हाला अंधारात ठेवले जात आहे. आयआयटी मुंबईत सुरू असलेल्या जातीआधारित भेदभावावर पांघरुण घालण्याचे काम सध्या सुरू असून या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे नष्ट होऊ नयेत, अशी आमची मागणी आहे.

 रमेश सोलंकी, दर्शनचे वडील