दशावतारी खेळ

488

>>डॉ. गणेश चंदनशिवे

दशावताराला जवळपास चारशे ते पाचशे वर्षांपासूनची जुनी परंपरा आहे. भगवान विष्णूने दुःखाचे निवारण करण्यासाठी दहा अवतार घेतले अशी आख्यायिका आहे.

कोकणातील वेंगुर्ले, मालवण, सावंतवाडी, गोवा भागातील जत्रा, यात्रांच्या उत्सवाप्रसंगी ग्रामदेवतेच्या उपासनेपोटी दशावतारी खेळांचे आयोजन केले जाते. दशावताराला जवळपास चारशे ते पाचशे वर्षांपासूनची जुनी परंपरा आहे. भगवान विष्णूने दुःखाचे निवारण करण्यासाठी दहा अवतार घेतले अशी आख्यायिका आहे. तीच दशावतारी नाटय़ मंडळी नाट्यरूपाने प्रेक्षकांचे मनेरंजन करतात. दहा अवतार सादर करताना पूर्वरंग आणि उत्तररंग असे दोन भाग दशावतारात पाहावयास मिळतात. पूर्वरंगात मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कलकी इ. पण दशावतारी मंडळी आठच अवतार सादर करतात. उत्तररंगात रामायण, महाभारत, पुराणातील पौराणिक आख्याने सादर करतात. परमेश्वराची कृपा संपादन करण्यासाठी व त्याची महती गायन, वादन, नृत्य आणि अभिनय याद्वारे लोकरंजनासाठीच दशावतार खेळला जातो, अशी कलावंतांची धारणा आहे. कोकणात सुगीचा हंगाम आला की, दशावतारी खेळाचे आयोजन केले जाते, सातेरी रवळनाथ या ग्रामदेवतेच्या उत्सवातील दशावतारी खेळ दशावतारातील मंडळे करण्यास सज्ज होतात. दशावतारी खेळ सुरू करण्यापूर्वी कलावंत स्नान करून वडिलोपार्जित चालत आलेल्या पेटाऱयाची पूजा करतात. हा पेटारा वेळूच्या बांबूपासून तयार केलेला असतो.

पेटाऱ्यात असलेला गणपतीचा लाकडी मुखवटा, सरस्वतीचा मोर, विष्णूची गदा, ब्रह्मदेवाचे चार तोंडे असलेला मुखवटा यांची पूजा करतात. ज्या ग्रामदेवतेसमोर दशावताराचा खेळ आहे तिथे पालखी काढून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढतात. या ढोलताशाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली जाते. हळूहळू देवस्थानाच्या गाभाऱयात गर्दी जमते आणि मध्यरात्रीनंतर दशावताराच्या खेळास प्रारंभ होतो. दशावताराची भाषा ही मराठीच, पण संस्कृतप्रचूर असते. असे असूनसुद्धा संकासुर मालवणी भाषेचा वापर करताना दिसतो. तो सूत्रधाराला मी इतरांपेक्षा कसा वेगळा आहे हे पटवून देताना दिसतो. तो तमाशातील बतावणीप्रमाणे बडय़ा बडय़ा बाता मारत असतो. चमत्कारिक भाषा करीत असतो. दशावतारातील वेषभूषा आणि रंगभूषा अतिशय आकर्षक असते. त्यातील संगीत, गीत, नृत्य हे कूळ कळसूत्री बाहुल्यांच्या हालचालींचे दिसतात. पूर्वरंग संपला की उत्तररंगात एखादे पौराणिक आख्यान लावण्याची परंपरा आहे.

आख्यानातील विषय जरी पौराणिक असले तरी अलीकडच्या काळात संवादातून वर्तमान संदर्भ कलावंत देत असतात. दशावतारात पुरुषच स्त्रीयांच्या भूमिका करताना दिसतात. त्यांच्या स्त्री पात्रवेषात प्रामुख्याने पुरुषीपणा दिसतो.

अलीकडच्या काळात स्त्रीयांची सुद्धा दशावतारी मंडळे उदयास आलेली दिसतात. दशावताराचे अभ्यासक डॉ. तुलसी बेहरे यांनी लोककला अकादमीच्या मुलामुलींना घेऊन दशावतारी नाटकाचा प्रयोग केलेला आहे. असे असले तरी दशावतारात स्त्रीयांना काम करण्याची परवानगी नाही. पूर्वरंग आणि उत्तररंग मिळून दशावताराचा खेळ उत्तररात्रीपासून सकाळी तांबडं फुटेपर्यंत आजही सादर होताना दिसतो. इतर प्रयोगात्मक लोककलांच्या तुलनेत दशावताराला आजही मोठय़ा प्रमाणात लोकाश्रय मिळालेला दिसतो. म्हणूनच या कलेला मरगळ आलेली नाही की ती इतर कलेसारखी अस्तंगत होत चाललेली दिसत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या