मर्दानी खेळ

1372

 संग्राम  चौगुले

हाराष्ट्रातील खेळसुद्धा मर्दानी खेळाडूला सक्षम बनवणारे!

कुस्ती, कबड्डी, खो-खो, मल्लखांब, लंगडी, सूर पारंब्या, आटय़ापाटय़ा… हे सगळे महाराष्ट्रातील मैदानी खेळ… या प्रत्येक खेळातून फिटनेसची गरज असते. कारण या सर्व खेळांमध्ये शरीराच्या प्रत्येक स्नायूंच्या क्षमतांचा वापर होतो. म्हणून फिटनेस चांगला असेल तरच आपल्या स्नायूंची क्षमता आणि लवचिकता वाढते. हे खेळ खेळत असताना सुरुवात आधी व्यायामाने केली जाते. या सगळ्यामुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढते. मग खेळाच्या सरावामुळे कामगिरीही चांगली होते.

आज महाराष्ट्रातील मैदानी खेळांचा जेवढा प्रसार झाला आहे तेवढा पूर्वी झाला नव्हता. पूर्वी फक्त ते गावागावांत खेळले जायचे. कुस्ती हा महाराष्ट्रातील सर्वात जुना आणि आवडता खेळ… त्यामुळेच १०० वर्षांपूर्वीपासून हा खेळ महाराष्ट्रात आणि पूर्ण हिंदुस्थानात खेळला जातोय. तरीही त्याचा प्रसार जेवढा व्हायला पाहिजे होता तेवढा होत नव्हता. पण… ‘दंगल’ आणि ‘सुलतान’ या चित्रपटांमुळे कुस्तीकडे आता शहरांमधले तरुणही आकर्षित होऊ लागले आहेत. कबड्डी हा मर्दानी खेळदेखील खूप वर्षांपासून महाराष्ट्रात खेळला जातोय. वास्तविक हा खेळ महाराष्ट्राचा  खेळ असूनही त्याला जास्त प्रसिद्धी मिळाली नव्हती. पण प्रो कबड्डीमुळे ती मिळाली. त्यामुळेच या खेळाकडेही आता तरुण आकर्षित होत आहेत.

असे असले तरी सूर-पारंब्या, आटय़ा-पाटय़ा, लंगडी हे मर्दानी खेळ मात्र दुर्लक्षित राहिले आहेत. या खेळांमध्ये खेळून शारीरिक क्षमता खूप चांगली होते. हे खेळ खेळताना खूप मजा येते. त्यामुळेच त्यांचा प्रसार व्हायची गरज आहे. या खेळांची जपणूक करायला हवी. कारण हे खेळ लहान मुलांना फिटनेसची आवड निर्माण करण्यासाठी फार मदत करतात. हे खेळ केवळ मजा म्हणून खेळायचे, पण त्यामुळे शरीर नकळत निरोगी आणि खणखणीत राहातो.

सळसळता उत्साह

महाराष्ट्राच्या मर्दानी खेळांमध्ये तलवारबाजी हा खेळ सामील करावा लागेल. कारण हा युद्धकौशल्य दाखवणारा मर्दानी खेळ आहे. तो पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटते. खंडोबा देवाच्या तीर्थक्षेत्री जेजुरीत दरवर्षी हा मर्दानी खेळ पारंपरीक पद्धतीने खेळतात. धाडस, सावधानता आणि चपळता ही तीनही कौशल्ये जशी तलवारबाजीत दिसतात, तशीच ती दांडपट्टय़ातही दिसतात. शिवकालीन मर्दानी खेळ असलेल्या दांडपट्टय़ाचा प्रचार आणि प्रसार होण्याची गरज आहे. शिवरायांच्या मावळ्यांचे दांडपट्टय़ाचे कौशल्य नेत्रदीपक होते. एका विशिष्ट पद्धतीने भाला पकडून तो जास्तीतजास्त लांब अंतरावर फेकायचा असतो. त्यालाच भालाफेक म्हटलं जातं. या मर्दानी खेळात भाल्याची पकड, धावत येणे आणि फेकणे आणि त्याचबरोबर पायांची अदलाबदल हे सगळे महत्त्वाचे असते. या खेळाची तालबद्धता पाहूनच प्रेक्षक थक्क होतात.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या