अर्थसंकल्प १फेब्रुवारीलाच,तारीख बदलाची विरोधकांची मागणी धुडकावली

arun-jaitley

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

यंदाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी रोजीच सादर केला जाणार असून त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पाच राज्यातील निवडणुकांनंतर अर्थसंकल्प सादर केरला जावा अशी मागणी देशभरातील अनेक पक्षांनी केली होती. ३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात होणार आहे. या संदर्भात केंद्र सरकारतर्फे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावावर राष्ट्रपतींनीही शिक्कामोर्तब केलंय.

या अर्थसंकल्पामध्ये आकर्षक घोषणा करून भाजपा त्याचा फायदा पाच राज्यातील निवडणुकांमध्ये घेईल असं म्हणत अनेक पक्षांनी अर्थसंकल्पाची तारीख बदलण्याची मागणी केली होती. काँग्रेसचं एक शिष्टमंडळ या संदर्भात मुख्य निवडणूक आयुक्तांनाही भेटलं होतं. मात्र त्याचा काहीही फायदा झालेला नाही. सरकारतर्फे याबाबत स्पष्टीकरण देण्यात आलंय ज्यात म्हटलं आहे की अर्थसंकल्प आणि निवडणुकांचा काहीही संबंध नाहीये.

  • अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारीपर्यंत असेल
  • ३१ जानेवारीला आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाईल.
  • १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाईल
  • रेल्वेसंदर्भातल्या घोषणाही याच अर्थसंकल्पात केल्या जातील, त्यासाठी वेगळा अर्थसंकल्प या वर्षापासून बंद करण्यात आलाय.
  • अधिवेशनाचा दुसरा टप्पा ९ मार्च ते १२ एप्रिलपर्यंत असेल