खूनप्रकरणी महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड अटकेत

47

लोणीकाळभोर, (सा. वा.)

जमिनीच्या वादातून हवेली तालुक्यातील वडकी येथे टोळक्याने कोयता, तलवार व लोखंडी सळ्यांनी वार करून एकाचा निर्घृण खून केला. आज सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड याच्यासह आठजणांना अटक केली आहे.

शिवाजी दामोदर गायकवाड (वय ५०, रा. वडकी) असे खून झालेल्याचे नाव आहे. गायकवाड यांचा मुलगा अजिंक्य याने लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लखन ऊर्फ लक्ष्मण गुलाब मोडक, सचिन मुरलीधर फाटे, संतोष सर्जेराव मोडक, सोमनाथ संतराम गायकवाड, दीपक दत्तात्रय मोडक, पंडित परशुराम मोडक, दत्तात्रय भानुदास गायकवाड, विवेक पंडित मोडक अशी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील दत्ता गायकवाडसह सहाजणांना दुपारीच अटक केली.

पंडित मोडक व त्यांचा मुलगा विवेक दोघेही फरारी होते. रात्री त्यांनाही अटक केल्याचे पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडूभैरी यांनी सांगितले.

आज सकाळी शिवाजी गायकवाड दुचाकीवरून हडपसर येथील सिरम कंपनीमध्ये कामावर निघाले होते. त्याच रस्त्याने त्यांचा मुलगा अजिंक्य हा चारचाकी गाडीतून निघाला होता. तो वडकीतून पोल्ट्रीकडे वळणार्‍या रस्त्यावर थांबला असता, वडकी गावच्या दिशेने एक पांढर्‍या रंगाची स्कॉर्पिओ गाडी येताना दिसली. मात्र, त्याच्या वडिलांची दुचाकी दिसली नाही. यामुळे वडिलांचा अपघात झाला काय? अशी शंका आल्याने त्याने चढावर जाऊन पाहिले असता, गावातील आठजण हत्यारांनी त्यांना मारहाण करीत होते.

अजिंक्य वडिलांना सोडवण्यासाठी पुढे गेला असता दत्तात्रय गायकवाड व पंडित मोडक यांनी ‘तू मध्ये आलास तर तुलाही खलास करू’, अशी धमकी दिली. गंभीर जखमी शिवाजी गायकवाड यांना उपचारांसाठी हडपसर येथील नोबल हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्यांनी जमिनीचा वाद व जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण केल्याचे सांगितले. त्यांना रुग्णालयात नेले असता, मृत घोषित केले. हा प्रकार समजताच गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे गावात बंदोबस्त तैनात केला आहे.

घटनास्थळी ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. जय जाधव, हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वैशाली कडूकर, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक राम जाधव यांनी भेट दिली.

आपली प्रतिक्रिया द्या