आश्चर्यम्! सुनांनी बांधले सासूचे मंदिर, रोज नित्यनेमाने होते पूजा-आरती

सासू व सुनांचे नाते आपणांस सर्वश्रुत आहेच. तुरळक ठिकाणी हे नाते आपण खेळीमेळीचे पाहत असतो, मात्र सर्वाधिक वादाचे कारण असलेले हे नाते आहे. छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये या नात्याला आदर्श वाटेल अशी घटना समोर आली आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत असलेल्या 11 सुनांनी आपल्या सासूचे भव्य मंदिर उभारले असून रोज नित्यनेमाने पूजा आरती केली जाते. गीतादेवी शिवप्रसाद तांबोळी यांचे 2010 मध्ये निधन झाल्यानंतर त्यांच्या सूनांनी आठवण म्हणून मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला होता.

बिलासपूर जिल्ह्यातील रतनपूर येथील शिवप्रसाद तांबोळी हे निवृत्त शिक्षक आहेत. ते सर्वजण एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असून 39 जण सदस्य आहेत. यामध्ये 11 सुनांचा समावेश असून अद्यापही घरात कुठलाच वाद होत नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. गीता देवी या नेहमी सुनांवर मुलीसमान प्रेम करत होत्या. त्यांच्या या मंदिराचा आदर्श परिसरातील अनेक कुटुंबे घेतात.

विशेष म्हणजे या महामाया देवी मंदिरात सोने चांदीचे अलंकारही त्यांच्या पुतळ्याला अर्पण केले आहेत. महिन्यांतून एकदा भजन कीर्तनाचे आयोजन करुन सर्वजण यामध्ये सहभागी होतात. आजच्या धावपळीच्या व विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये असे उदाहरण दुर्मिळ होत चालले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या