कर्जबाजारी शेतकरी पित्याच्या चिंतेने उपवर तरुणीची आत्महत्या

99

सामना ऑनलाईन, पाचोडा

घरात अठराविश्वे दारिद्र्य. हाताला काम नाही, कर्ज काढून एका मुलीचं कसंबसं लग्न उरकलं, मात्र  दुसऱ्या मुलीचं लग्न कसं करायचं, अशा विवंचनेत असलेल्या माता- पित्याचे दुःख पाहून एका १९ वर्षाच्या तरुणीने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी दादेगाव (ता. पैठण) येथे घडली. राजश्री काकासाहेब सातपुते असे या तरुणीचे नाव आहे. तिच्या अकाली मृत्यूमुळे पाचोड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार दादेगाव (ता. पैठण) येथील काकासाहेब सातपुते यांची दादेगाव शिवारात जेमतेम दोन एकर शेती आहे. शेतीवर कुटुंबाचा खर्च भागत नसल्याने ते दुसऱ्याच्या शेतावर जाऊन मोलमजुरी तथा ऊसतोडीचे  काम करून आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. त्यांना दोन मुली व दोन मुले असून त्यांनी दोन वर्षापूर्वी स्टेट बँकेचे कर्ज काढून एका मुलीचे कसेबसे लग्न उरकले. दुसरी मुलगी राजश्री हिला मात्र घरच्या परिस्थितीमुळे अकरावीनंतर पुढील शिक्षण बंद करावे लागले.  मात्र दुसरी मुलगीही उपवर झाल्याने माता-पित्याला तिच्या लग्नाची चिंता निर्माण झालेली होती. तिच्यासाठी दोन चार ठिकाणचे स्थळं चालून आले, मात्र पैशाअभावी विवाहयोग जुळून आला नाही.

माता- पित्याने दिवसभर काबाडकष्ट करावेत आणि रात्री मात्र आपल्या मुलीचे लग्न कसे व्हावे याची चिंता करावी, ही बाब राजश्री हिला सतत सतावत होती. घरात अठराविश्वे दारिद्र्य, हाताला काम नाही, शेतीतही अपेक्षित उत्पन्न नाही. आता उपवर झालेल्या मुलीला कसे उजवायचे… हे आईवडिलांचे संभाषण तिच्या सतत कानी पडत असे. अखेर याच विवंचनेतून सोमवारी (दि. २७ रोजी) राजश्री हिने घरातील सर्वजण शेतात गेल्याचे पाहून सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घरात विषारी औषध प्राशन केले. राजश्रीने विष घेतल्याचे शेजारी असलेल्या तिच्या आत्याला कळताच तिने नातेवाईकांना कळवले. माहिती मिळताच नातेवाईकांसह सरपंच कुंदन शेळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय हजारे आदींनी तिला पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित जैन यांनी प्राथमिक उपचार केला मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने तिला पुढील उपचारासाठी संभाजीनगरात आणले. मात्र घाटीत उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली.

आत्महत्येची तिसरी घटना
पाचोड परिसरात दारिद्र्याला कंटाळून दोन शेतमजुरांनी आधीच आत्महत्या केलेली असतानाच आता ही तिसरीही आत्महत्येची घटना घडल्यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.  या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या