शहिदाच्या मुलीला रुपाणींच्या सभेतून काढलं बाहेर

41

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. मात्र, भाजपने आपल्या प्रचाराच्या रॅलीत शहिदाच्या मुलीला सभेतून बाहेर काढल्याची घटना घडली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या १ डिसेंबर रोजी झालेल्या प्रचारसभेत घडलेल्या या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

भाजपच्या प्रचारसभेत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं भाषण सुरू होतं. त्यावेळी प्रेक्षकांमधून एक तरुणी उठली आणि व्यासपीठाच्या दिशेने जाऊ लागली. मात्र, तिथे उपस्थित असलेल्या महिला पोलिसांनी तिला व्यासपीठावर जाऊ दिलं नाही. ती तरुणी मला त्यांना भेटू द्या असं म्हणत आर्जवं करत होती. मात्र, तिला व्यासपीठापर्यंत पोहोचू न देता तिथून बाहेर काढण्यात आलं. हे सर्व सुरू असताना, रुपाणी यांनी व्यासपीठावरून ‘ही सभा झाल्यानंतर भेटू’ असं आश्वासन दिलं. मात्र, सभा संपल्यानंतर त्यांनी दिलेला शब्द काही पाळला नाही. या तरुणीचं नाव रुपल तडवी(२६) असून ती बीएसएफचे शहीद जवान अशोक तडवी यांची मुलगी आहे.

तडवी कुटुंबीय हे आदिवासी जमातीतील आहेत. अशोक तडवी शहीद झाल्यानंतर तडवी कुटुबीयांना उदरनिर्वाहाचं साधन म्हणून जमिनीचा तुकडा देण्यात येणार होता. मात्र, अद्याप तो देण्यात आलेला नाही. गेली कित्येक वर्षं तडवी कुटुंबीय त्या जमिनीच्या तुकड्यासाठी सरकारी उंबरठे झिजवत आहेत. त्यासाठीच रुपलला मुख्यमंत्र्यांना भेटायचं होतं, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

या घटनेचा निषेध करत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘भाजपच्या मुजोरपणाची ही हद्द आहे’ असं म्हणत ‘परम देशभक्त’ विजय रुपाणी यांनी शहिदाच्या मुलीला सभेबाहेर काढल्याची टीकाही गांधी यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या