वैशाली–रूपालीमध्ये एकेकाळी काम करणाऱ्यानेच हॉटेल हडप केली ?

54

सामना ऑनलाईन,पुणे

पुण्याची ओळख बनलेल्या वैशाली आणि रूपाली या हॉटेलच्या मालकत्वाबाबत एक धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. एकेकाळी हॉटेलमध्ये काम करणाऱ्या जगन्नाथ शेट्टी यांनी ही दोन्ही हॉटेल संगनमताने गिळंकृत केल्याचा आरोप या हॉटेलचे मूळ मालक श्रीधर शेट्टी यांच्या मुलीने केला आहे.  श्रीधर शेट्टी यांच्या मोठ्या मुलीशी जगन्नाथ शेट्टी यांनी लग्न केलेलं आहे.श्रीधर शेट्टी यांना एकूण तीन मुली होत्या ज्यातल्या शशिकला शेट्टी यांनी जगन्नाथ शेट्टींविरोधात तक्रार नोंदवली आहे.

शशिकला यांनी डेक्कन पोलिसांत केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की जगन्नाथ शेट्टी यांनी त्यांच्या वडीलांनी मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या वैशाली आणि रूपाली या हॉटेलची मालमत्ता गिळंकृत केली आहे. या दोन्ही हॉटेलपासून मिळणारा नफा जगन्नाथ शेट्टी यांनी स्वत:च्या नावावर फिरवून आजपर्यंत कोट्यवधी रूपये जमा केले आहेत. इतकंच नाही तर शशिकला यांच्या आईचे दागिने तसेच वडीलांनी शशिकला यांना दिलेलेल दागिने आणि इतर प्रॉपर्टीपण जगन्नाथ शेट्टी यांनी हडप केली आहे. जगन्नाथ शेट्टी यांनी हॉटेल स्वत:च्या नावावर करण्यासाठी वेळोवेळी शशिकला यांच्या आईच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या आणि त्याचा गैरवापर केला असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. डेक्कन पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे जगन्नाथ शेट्टींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या