वडिलांच्या मृत्यूचे दुःख पचवत मुलांनी साकारल्या आकर्षक गणेश मूर्ती

गणेश मूर्तीवर रंगरंगोटीचे काम करताना कु. चंद्रकला, नम्रता आणि तेजस कवटकर. (अमित खोत, मालवण)

सामना प्रतिनिधी । मालवण

आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देत काहीजण समाजात आपला एक वेगळा आदर्श निर्माण करतात. त्यापैकीच एक असे मालवण हडी येथील कवठकर कुटुंब. हडी मार्गेश्वर येथील कवटकर कुटुंबातील चंद्रकला, नम्रता आणि तेजस या मुलांचे वडिलांचे छत्र नियतीने एका अपघातात चार महिन्यांपूर्वी हिरावले. मात्र या परिस्थितीत न डगमगता मुलांनी वडिलांची गणेश मुर्तीशाळा सुरु ठेवणार असा निश्चय केला आणि बघता बघता आकार घेऊ लागल्या सुबक गणेश मुर्त्या. गणेश उत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असून गणेश मूर्ती रंगून घरोघरी जाण्यास सज्ज होत आहेत.

मालवण तालुक्यातील हडी मार्गेश्वर येथील कै. संदिप कवटकर यांचे मुंबई मार्गावर एका भीषण अपघातात निधन झाले. पत्नी व तीन मुलांसह हडी येथे राहणारे संदीप गवंडीकाम व गणेशमूर्ती बनवून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होते. त्यांना पत्नीची पण मोलाची साथ होती. पण पाच महिन्यांपूर्वी एका अपघात होत्याचे नव्हते झाले.

मोठी मुलगी चंद्रकला हिने नुकतीच आपली पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. तर नम्रता ही मुक्त विद्यापीठ मध्ये दुसऱ्या वर्षाला शिकत असुन मुलगा तेजस हा नववीमध्ये शिकत आहे. आईला आधार देण्यासाठी तिन्ही भावंडांनी वडिलांचा गणेश मूर्ती कलेचा वारसा हा कायम पुढे ठेवण्याचा निर्धार केला.

३०-३५ वर्षांपासुन वडील संदिप कवटकर यांनी सुरू ठेवलेली गणेश मूर्ती शाळा बंद पडु न देण्याचा निर्धार या तिन्ही भावंडांनी केला. संदीप कवटकर यांनी यापूर्वी मुले लहान असल्याने आपल्या मूर्तीकलेच्या कामात हस्तक्षेप करू दिला नव्हता. मात्र कधी कधी संदीप हे मुलांची मदत घेत असत. वडिलांना मूर्ती साकारताना पाहत पाहत मुलांमध्ये देखील आपसूक ही कला भिनली गेली. म्हणूनच या निरीक्षणातून मिळालेल्या ज्ञानाच्या आधारावर मुलांनी वडिलांची ही कला जिवंत ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले. शिक्षण घेता घेता मिळालेल्या वेळेत या भावंडांनी गणेश मुर्ती घडविण्यास सुरुवात केली. यासाठी या भावंडाना दिनेश मेस्त्री, नारायण होडेकर, महेंद्र परब, संजय परब, नित्यानंद कदम, महेश भगत यांचे सहकार्य लाभले.

भावंडांच्या या प्रयत्नाला दरवर्षीच्या ग्राहकांनी देखील प्रतिसाद व पाठिंबा देत मुलांवर विश्वास दाखवत मूर्त्यांच्या ऑर्डर दिल्या. ग्राहकांच्या प्रतिसादामुळे या मुलांनाही मोठा धीर मिळाल्याने त्यांनी जोमाने मूर्ती बनविण्याचे काम सुरू केले. ऑर्डर प्रमाणे या मुलांनी सुबक व आकर्षक अशा गणपतीच्या ५५ मुर्त्या बनविल्या आहेत. या मुर्त्या सर्वांच्या पसंतीस उतरत असून वडिलांच्या निधनाने खचून न जाता स्वतःवर विश्वास ठेवत मुलांनी वडिलांची कला जिवंत ठेवण्यासाठी केलेल्या या धाडसाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.