7 जणांची हत्याच, ‘करणी’मुळे घरातील तरुण दगावल्याच्या संशयातून घडले हत्याकांड

भीमा नदीपात्रात मंगळवारी 7 जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या सातही जणांनी आत्महत्या केली असावी असा पूर्वी संशय व्यक्त केला जात होता. मात्र ही आत्महत्या नव्हती तर या सगळ्यांचा खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मृतांमध्ये 2 महिला आणि 3 लहान मुलांचाही समावेश आहे. आत्महत्या केलेले कुटुंब मुळचे बीड जिह्यातील आहे. सर्व मृतांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. पती मोहन उत्तम पवार (वय 45), पत्नी संगीता ऊर्फ शहाबाई मोहन पवार (वय 40), जावई श्याम पंडित फलवरे (वय 28), मुलगी राणी फलवरे (वय 24), नातू रितेश फलवरे (वय 7), छोटू फलवरे (वय 5) आणि कृष्णा  फलवरे (वय 3) अशी मृतांची नावे आहेत.

जवळपास 3 महिन्यांपूर्वी मोहन पवार यांचा मुलगा अमोल पवार त्याच्या चुलत भावासोबत म्हणजेच धनंजय पवारसोबत धनंजय याच्या सासुरवाडीला गेला होता. सासुरवाडीवरून परत येत असताना मोहन आणि धनंजय या दोघांना अपघात झाला होता, ज्यामध्ये धनंजय पवार याचा मृत्यू झाला होता. धनंजयच्या मृत्यूनंतर त्याच्या घरच्यांना असा संशय येत होता की धनंजयवर करणी केली होती, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही करणी मोहन आणि त्याच्या घरच्यांनी केली असावी अशा धनंजयच्या कुटुंबियांना संशय होता. या संशयातूनच हे हत्याकांड घडल्याचे सांगण्यात येत आहे. पुणे ग्रामीण पोलीस आज दुपारी 1 च्या सुमारास यासंदर्भात एक पत्रकार परिषद घेऊन तपासाबाबतची अधिक माहिती देण्याची शक्यता आहे.

मृतांमध्ये 7,5,3 या वयाच्या मुलांचा समावेश आहे. मोहन पवार आणि त्याच्या घरच्यांना धनंजय याच्या परिचितांनी गळा आवळून ठार मारलं होतं. तीन मुलं गाडीमध्ये झोपलेली असताना त्यांना झोपेतच नदीमध्ये फेकून देण्यात आलं होतं. या तिघांचा बुडून मृत्यू झाल्याचे कळते आहे.