गुलाबी चेंडूची ‘निकाल’ लावण्याची परंपरा, वाचा डे-नाईट कसोटीच्या खास गोष्टी

टीम इंडिया कोलकातामध्ये उद्या 22 नोव्हेंबरपासून बांगलादेशविरुद्ध आपला डे-नाईट कसोटी सामना खेळणार आहे. टीम इंडिया आणि बांगलादेशचा संघ पहिल्यांदाच डे-नाईट कसोटी सामना खेळणार आहे. गुलाबी चेंडूने होणाऱ्या या सामन्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या कसोटी सामन्यासाठी बीसीसीआय आणि बंगाल क्रिकेट असोसिएशनने विशेष लक्ष दिेले आहे.

… म्हणून पहिल्या डे-नाईट कसोटीपूर्वी विराट कोहली चिंतेत

डे-नाईट कसोटीचा इतिहास पाहिला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिला सामना 2015 ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात खेळला गेला. तेव्हापासून ते आतापर्यंत 11 डे-नाईट कसोटी सामने खेळले गेले आहेत. विशेष म्हणजे या सर्वच सामन्यांचा निकाल लागला आहे.

day-night

आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक पाच डे-नाईट कसोटी सामने खेलले आहेत. पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत डे-नाईट कसोटीचे आयोजन केले आहे. कोलकाता कसोटीनंतर डे-नाईट कसोटीचे आयोजन करणारा हिंदुस्थान सातवा देश ठरणार आहे. त्यामुळे हिंदुस्थान आणि बांगलादेश संघात कोलकाता येथे होणाऱ्या डे-नाईट कसोटीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. डे-नाईट कसोटी इतिहासातील हा 12 वा सामना असणार आहे.

डे-नाईट कसोटीचा इतिहास –

 • पहिला डे-नाईट सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघात 2015 ला खेळला गेला. लो स्कोरिंग झालेल्या या लढतीत ऑस्ट्रेलियाने 3 विकेट्सने विजय मिळवला.
 • दुसरा डे-नाईट सामना 2016 मध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघात खेळला गेला. यात पाकिस्तानने वेस्ट इंडीजवर 56 धावांनी विजय मिळवला होता.
 • तिसरा डे-नाईट सामना 2016 ला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत झाला. यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 7 विकेट्सने मात दिली.
 • चौथा डे-नाईट सामना ऑस्ट्रेलिया पाकिस्तानमध्ये 2016 मध्ये रंगला. या लढतीत ऑस्ट्रेलिया 39 धावांनी विजय मिळवला.
 • पाचवा डे-नाईट कसोटी सामना 2017मध्ये इंग्लंड आणि वेस्ट इंडीजमध्ये झाला. यात इंग्लंडने वेस्ट इंडीजचा एक डाव आणि 209 धावांनी पराभव केला. डे-नाईट कसोटीच्या इतिहासातील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा विजय आहे.

day-night-test

 

 • सहावा डे-नाईट कसोटी सामना 2017मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकामध्ये रंगला. या लढतीत पाकिस्तानचा 68 धावांनी पराभव झाला होता.
 • सातवा डे-नाईट कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये 2017 साली झाला. या लढतीत ऑस्ट्रेलियाने 120 धावांनी विजय मिळवला.
 • आठवा डे-नाईट कसोटी सामना दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे संघात 2017 मध्ये रंगला होता. या लढतीत आफ्रिकेने एक डाव आणि 120 धावांनी विजय मिळवला.
 • नववा डे-नाईट कसोटी सामना 2018 ला न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये झाला. यात न्यूझीलंडने इंग्लंडवर एक डाव आणि 49 धावांनी विजय मिळवला होता.
 • दहावा डे-नाईट कसोटी सामना 2018 ला वेस्ट इंडीज आणि श्रीलंकेत रंगला. या लढतीत श्रीलंकेने वेस्ट इंडीजचा 4 विकेट्सने पराभव केला.
 • अकरावा डे-नाईट कसोटी सामना ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेत 2019 मध्ये रंगला. या लढतीत ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेवर एक डाव आणि 40 धावांनी विजय मिळवला.

गुलाबी चेंडूची करामत!

pink-ball

डे-नाईट कसोटीचे सर्वाच मोठे आव्हान असते चेंडूचे. साधारणत: कसोटी लढतीसाठी लाल चेंडूचा वापर केला जातो, तर एक दिवसीय लढतीसाठी पांढऱ्या चेंडूचा वापर होतो. परंतु रात्रीच्या प्रकाशात हे दोन्ही चेंडू फलंदाजाला व्यवस्थित दिसू शकत नाही यासाठी गुलाबी चेंडूचा वापर केला जातो. टीम इंडिया आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या डे-नाईट कसोटीसाठी टीम इंडियाने एसजी कंपनीकडून एक डझन गुलाबी चेंडू मागवले आहेत. पांढऱ्या आणि लाल चेंडूच्या तुलनेत गुलाबी चेंडूचा रंग आणि आकार व्यवस्थित ठेवणे अशक्य असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. या चेंडूने स्विंगही अधिक मिळतो, त्यामुळे वेगवान गोलंदाजांची चांदी होते, मात्र हा चेंडू जास्त स्पिन होत नसल्याची तक्रार फिरकीपटूंनी केली आहे. गुलाबी चेंडू बनवण्यासाठी 7 ते 8 दिवस लागतात. गुलाबी चेंडूची चमक कायम राहण्यासाठी त्यावर रंगांच्या अनेक लेअर्स चढवल्या जातात.

आपली प्रतिक्रिया द्या