कोरोना लसीची चाचणी पुन्हा सुरू करण्यास सिरम इन्स्टिट्यूटला डीसीजीआयची परवानगी

469

सिरम इन्स्टिट्यूटकडून कोरोना लसीच्या चाचण्या देशात पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. औषध महानियंत्रक (डीसीजीआय) यांनी सिरम इन्स्टिट्यूला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीच्या क्लिनीकल चाचण्या पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीच्या अॅस्टेजेनिकासोबत कोरोना लस विकसीत करण्याचे काम करत आहे. या लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील क्लिनीकल चाचण्या सुरू झाल्या आहेत. मात्र, लस देण्यात आलेला एकजण आजारी पडल्याने ब्रिटनमध्ये या चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या. त्यानंतर हिंदुस्थानातही या चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या. मात्र, आता डीसीजीआयने या चाचण्या पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

डीसीजीआय डॉ व्ही.जी. सोमाणी यांनी मंगळवारी सिरम इन्स्टिट्यूटला कोरोना लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनीकल चाचण्या सुरू करण्यास परवागनी दिली आहे. ही परवानगी देताना डीसीजीआयने चाचण्यांमध्ये विशेष दक्षता घेण्यासह सुरक्षेच्या दृष्टीने आणखी काही अटी ठेवल्या आहेत. तसेच काही सूचनाही केल्या आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठीचे नियम आणि उपचाराबाबतची माहिती देण्यासाठी डीसीजीआयने सिरम इन्स्टिट्यूटला सांगितले आहे. ब्रिटनमधील डेटा सेफ्टी मॉनिटरिंग बोर्डने (डीएसएमबी) सुरक्षिततेबाबतचा अहवाल आणि सूचना सादर केल्यावर डीसीजीआयने सिरम इन्स्टिट्यूटला चाचण्या पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. याआधी चाचणीदरम्यान लस दिलेला एकजण आजारी पडल्याने 11 सप्टेंबरला देशात चाचण्या थांबवण्याचे निर्देश देण्यात आले होते.

हिंदुस्थानात चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 ऑगस्टला 100 जणांना लस देण्यात आली होती. त्यापैकी कोणालाही आरोग्याची कोणतीही समस्या झालेली नाही. अ‍ॅस्ट्रॅजेनिकाने लसीसाठी ब्रिटनमध्येही पुन्हा चाचण्या सुरू केल्या आहेत. सिरम इन्स्टिट्यूटने 15 सप्टेंबर रोजी ब्रिटनमधील डीएसएमबी आणि डीएसएमबी इंडियाच्या सुरक्षिततेबाबतच्या सूचना सादर केल्या आणि क्लिनिकल चाचणी पुन्हा सुरू करण्याची परवानगी मागितली होती. त्यानुसार डीसीजीआयने विशेष दक्षता घेण्यासह काही अटीशर्थीवर चाचण्या पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या