‘डीआरडीओ’च्या कोरोना प्रतिबंधक ‘2-DG’ औषधाला DCGI ची मंजुरी; ऑक्सिजनची गरज कमी होणार

वाढत्या कोरोनाच्या प्रकोपादरम्यान आणि ऑक्सिजनच्या संकटादरम्यान एक दिलासादायक बातमी आली आहे. ‘ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (DCGI) कोरोनावर उपचार म्हणून आणखी एका औषधाच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. हे औषध डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलायड सायन्सेस (INMAS) आणि हैदराबाद सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युअर बायोलॉजीने (CCMB) संयुक्तपणे बनवले आहे. या औषधाचे नाव 2-deoxy-D-glucose (2-DG) असे ठेवण्यात आले आहे. हे औषध तयार करण्याची जबाबदारी हैदराबादमधील डॉ. रेड्डी लॅबोरेट्रीजला देण्यात आली आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, 2-deoxy-D-glucose (2-DG) या औषधाचे क्लिनिकल चाचणी यशस्वी झाली आहे. ज्या रुग्णांवर या औषधाची चाचणी करण्यात आली ते रुग्ण वेगाने बरे होताना दिसले. तसेच रुग्णांचे ऑक्सिजनवरील अवलंबवित्वही कमी झाले. तसेच या औषधाच्या वापरामुळे कोरोना रिपोर्ट इतर रुग्णांच्या तुलनेत लवकर निगेटिव्ह येत आहे. अर्थात हे रुग्ण लवकर बरे होत आहेत.

डीआरडीओच्या संशोधकांनी एप्रिल 2020 मध्ये या औषधाची चाचणी सुरु केली होती. चाचणीमध्ये हे औषध कोरोना विषाणूला रोखण्यास यशस्वी ठरत असल्याचे दिसून आले. याच आधारावर ‘ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (DCGI) मे 2020 मध्ये या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलची मंजुरी दिली होती. आता हे औषध क्लिनिकल ट्रायलमध्येही यशस्वी असल्याचे सिद्ध झाले असून DCGI ने कोरोना रुग्णांवर उपचार म्हणून याच्या आपातकालीन वापराला मंजुरी दिली आहे.

क्लिनिकल ट्रायलमध्ये काय दिसून आले?

– देशभरातील रुग्णालयांमध्ये या औषधाची चाचणी घेण्यात आली. मे ते ऑक्टोबर दरम्यान 110 रुग्णांवर दुसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यात आली. चाचणीमध्ये ज्या रुग्णांना हे औषध देण्यात आले ते इतर रुग्णांच्या तुलनेने अडीच दिवस आधीच कोरोनामुक्त होत असल्याचे दिसून आले.

– तसेच डिसेंबर 2020 ते मार्च 2021 दरम्यान देशभरातील 27 रुग्णालयातील 220 रुग्णांवर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी घेण्यात आली. चाचणीदरम्यान 42 टक्के रुग्णांचे ऑक्सिजनवरील अवलंबवित्व तिसऱ्या दिवशी संपल्याचे निदर्शनास आले.

कसे काम करते औषध?

हे औषध पावडर स्वरुपात असून पाण्यात मिसळून ते रुग्णाला दिले जाते. हे औषध संक्रमित पेशींमध्ये जमा होते आणि व्हायरस पसरू देत नाही. या औषधाचे वैशिष्ट्य म्हणजे हे संक्रमित पेशींना ओळखते, त्यामुळे व्हायरस पसरू शकत नाही. कोरोना काळात याचा वापर जीवदान देणारा ठरू शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या