डीसीपी भुजबळ आणि एसीपी पाटील म्हणतात, पैशांबाबत गृहमंत्र्यांशी बोलणेच झाले नाही

राज्याच्या तत्कालीन गृहमंत्र्यांनी  एपीआय सचिन वाझे याच्याकडे 100 कोटींची मागणी केली होती, असा आरोप एका पत्राद्वारे माजी पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांनी केल्यानंतर आता यासंबंधी नवीन बाब उघडकीस आली आहे. त्या पत्रात एसीपी संजय पाटील आणि उपायुक्त राजू भुजबळ यांच्या नावाचा उल्लेख होता. पण या दोन्ही अधिकाऱयांचा जबाब आता समोर आला असून  त्यांची मुंबईतील बार व रेस्टॉरण्टकडून पैसे घेण्याबाबत गृहमंत्र्यांशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे परमबिर सिंह यांच्या आरोपात किती तथ्य आहे, असा सवाल उपस्थित झाला आहे.

संजय पाटील म्हणतात, एकदाच ब्रिफिंगसाठी भेटलो

1 मार्च रोजी ठाणे शहरातील हुक्का पार्लरबाबत अधिवेशनामध्ये उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाबाबत मुंबई शहराची माहिती घेऊन ब्रिफिंगसाठी मी गृहमंत्री यांच्या शासकीय निवासस्थानामधील दालनात इतर अधिकाऱयांसोबत भेटलो होतो. त्या व्यतिरिक्त या कालावधीत किंवा यापूर्वी अन्य कोणत्याही विषयासंदर्भात माझी व अनिल देशमुख यांची भेट अथवा चर्चा झाली नसल्याचे संजय पाटील यांनी त्यांच्या जबाबात स्पष्ट केले आहे. तसेच कार्यालयीन आवारात वाझेसोबत माझी भेट झाली होती. तेव्हा वाझे यांनी तपासाच्या ब्रिफिंगसाठी गृहमंत्र्यांना भेटल्याचे सांगितले.  त्यावेळी गृहमंत्री यांनी 1750 बार आणि रेस्टॉरन्ट आस्थापना मुंबईत असून तीन लाखाप्रमाणे जमा होतात अशी त्यांना मिळालेल्या माहितीची त्यांनी वाझेकडे विचारणा केली, असे वाझे यांनी मला सांगितले होते. मात्र वाझे आणि गृहमंत्री यांच्या प्रत्यक्षात भेट झाली किंवा नाही याबाबत काहीही माहिती नाही, असे पाटील यांचे म्हणणे आहे.  चर्चेदरम्यान गृहमंत्र्यांच्या नावाचा उल्लेख झालेला नसल्याचे संजय पाटील यांनी जबाबात म्हटले आहे.

राजू भुजबळ म्हणतात तसे काही बोलणेच झाले नाही

1 ते 10 मार्च रोजी राज्याच्या विधिमंडळाचे अधिवेशन होते. त्याकरिता गृहमंत्री व अन्य वरिष्ठांना नोडल अधिकारी म्हणून ब्रिफिंग करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्यानुसार 4 मार्च रोजी अधिवेशन कामकाजाबाबत अन्य अधिकाऱयांसोबत ज्ञानेवश्वरी निवासस्थानी हजर होतो. बैठक संपल्यानंतर एसीपी संजय पाटील त्याठिकाणी आले होते. मात्र आस्थापनांबाबतच्या माहितीत तथ्य नसल्याचे पाटील यांनी पलांडे यांना त्यावेळी सांगितले होते. त्यानंतर आम्ही आपापल्या घरी निघून गेलो, असे उपायुक्त भुजबळ यांनी त्यांच्या जबाबात म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या