सुकीवली येथील खून प्रकरण, वर्षानंतरही प्रवीणचा मृतदेह प्रयोगशाळेत

सामना प्रतिनिधी, खेड

प्रेमात अडसर ठरल्याने प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच केलेल्या प्रवीण सकपाळ याच्या खुनाला २४ जून रोजी वर्ष पूर्ण झाले. मात्र मिरज येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी नेलेला त्याचा मृतदेह आजही तिथेच असल्याने त्याच्या मृतदेहाची विटंबना होत आहे. मुलाच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करता यावेत म्हणून त्याचे आईवडील प्रेताचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु तांत्रिक बाबींमुळे प्रवीणचा मृतदेह अद्याप मिळाला नसल्याने त्याच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरूच आहे.

खेड तालुक्यातील सुकीवली गावचे पोलीसपाटील सखाराम सकपाळ यांचा मुलगा प्रवीण याचा २०१० मध्ये प्रियांकाशी आंतरजातीय विवाह झाला होता. लग्नानंतर प्रवीण २४ जून २०१६ रोजी बेपत्ता झाला. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो कुठेही आढळून आला नाही. त्याचा मोबाईलही स्विच ऑफ असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याची पत्नी प्रियांका हिने खेड पोलिसांत पती बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल केली.

२९ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीदरम्यान भरणे बाईतवाडीनजीक असलेल्या स्मशानभूमीत दफन केलेले एक प्रेत वर आले होते. पोलिसांनी दफन केलेला तो मृतदेह २० ऑक्टोबर रोजी पुन्हा बाहेर काढून या मृतदेहाची डीएनए टेस्ट केली असता तो मृतदेह प्रवीण सकपाळ याचाच असल्याचे निष्पन्न झाले होते. याचदरम्यान गुन्हेगारांना पाठीशी घातल्याचा ठपका ठेवत खेडचे तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक जांभळे यांच्यासह अप्पा दाभोळकर आणि मारळकर या दोन हवालदारांना निलंबित करण्यात आले होते.

प्रविणचा निर्दयीपणे खून करणारी त्याची पत्नी प्रियांका आणि तीचा प्रियकर रोशन भुवड यांना न्यायालयाने शिक्षाही सुनावली. सद्यस्थितीत प्रियांका आणि रोशन दोघेही तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. परंतु मिरज येथील प्रयोगशाळेत डीएनए चाचणीसाठी नेलेला त्याचा मृतदेह अद्याप प्रवीणच्या नातेवाईकांच्या ताब्यात मिळाला नसल्याने मृत्यूपश्चातही प्रवीणच्या मृतदेहाची विटंबना सुरूच आहे.