अंत्यसंस्काराची वाट पाहत मृतदेहाचा उरला सांगाडा, मध्य प्रदेशच्या सरकारी रुग्णालयातील अतिशय संतापजनक घटना

544
file photo

काँग्रेसचे बहुमतातील सरकार पाडून सत्तेत आलेले भाजपचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मध्यप्रदेशात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शवागारात ठेवलेल्या मृतदेहाचा अंत्यसंस्काराची वाट पाहत अक्षरशः सांगाडाच उरला. संपूर्ण विभागात दुर्गंधी येत असल्याची तक्रार करण्यात आल्यानंतर हा मृतदेह हटवण्यात आला.

इंदोर येथील महाराजा यशवंतराव होळकर हे मध्यप्रदेशातील सर्वात मोठे सरकारी रुग्णालय आहे. बेजबाबदारपणासाठी हे रुग्णालय कुख्यात आहे. रुग्णालयातील शवागारात 16 प्रिझर असून त्यात मृतदेह ठेवण्याची सोय आहे. मात्र दहा दिवसांपासून एक मृतदेह शवागारात स्ट्रेचरवरच ठेवण्यात आला. हा मृतदेह नेण्यासाठी कुणीही आले नाही. अंत्यसंस्काराची वाट पाहत हा मृतदेह सडला, त्यावरील त्वचा गळून पडली. मृतदेहाची प्रचंड दुर्गंधी सुटली. दुर्गंधी सुटल्याची बोंबाबोंब झाल्यानंतर हा मृतदेह स्ट्रेचरवरून हलवण्यात आला.  

एकच आठडा  मृतदेह ठेवतात

रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पी. एस. ठाकूर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की बेवारस मृतदेह आम्ही एक आठवडा ठेवतो. या काळात कुणी नातलग आला तर त्यांच्या हवाली करण्यात येतो. नसता अंत्यसंस्कारासाठी एनजीओ का महानगरपालिकेला सूचना देण्यात येते. कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या जास्त आहे. त्यामुळे मृतदेह ठेवण्यासाठी जागा कमी पडत आहे. त्यामुळे कदाचित असा प्रकार घडला असावा अशी सारवासारव त्यांनी केली.  

ना पोस्टमॉर्टेम झाले ना तपासणी

शहरात सापडलेले अज्ञात मृतदेह शवविच्छेदनासाठी महाराजा यशवंतराव रुग्णालयात पाठवण्यात येतात. दहा दिवसांपूर्वी हा मृतदेहही आणण्यात आला. स्ट्रेचरवर आणलेला मृतदेह तसाच ठेवण्यात आला. त्याचे ना पोस्टमॉर्टेम झाले ना तपासणी. त्या मृतदेहाकडे कुणी ढुंकूनही पाहिले नाही. मृतदेह बेवारस असेल तर पोस्टमॉर्टेमनंतर महानगरपालिका का एनजीओकडे अंत्य संस्कारासाठी देण्यात येतो.

आपली प्रतिक्रिया द्या