चंद्रपूरच्या दोन तरुणांचे चंदीगडमध्ये मृतदेह सापडले, मृतकांपैकी एकजण माजी केंद्रीय मंत्र्याचा पुतण्या

चंद्रपूरच्या दोन तरुणांचे पंजाबमधील चंदीगडमध्ये मृतदेह सापडले आहेत. एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत या दोघांचे मृतदेह सापडले असून या दोघांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. महेश अहिर, हरीश धोटे असी या तरुणांची नावे आहेत. यातील महेश अहिर हा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या पुतण्या आहे. या दोघांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये.

महेश हरिश्चंद्र अहिर आणि त्याचा मित्र हरीश धोटे हे दोघेजण घरून बेपत्ता झाले होते. चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये हे दोघे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी दाखल केली होती. त्या अनुसार पोलिसांनी आपला तपास सुरू होता. तपास सुरू चंदीगढ येथील सेक्टर 43 मधील बसस्थानक (आयएसबीटी-43) समोरील सेक्टर 52 अंतर्गत येणाऱ्या कजेहडी गावाशेजारील जंगलात दोन युवकांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत आढळून आले होते. या घटनेची नोंद सेक्टर 36 पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. चंदीगढ पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर चौकशीला सुरुवात केली होती. हे दोन्ही युवक एका हॉटेलमध्ये थांबले होते. तिथून मिळालेल्या माहितीवरून हे युवक चंद्रपूरचे असल्याचं चंदीगड पोलिसांना कळालं होतं. यामुळे चंदीगड पोलिसांनी चंद्रपूर पोलिसांशी संपर्क साधून या दोघांच्या मृतदेहाबाबतची माहिती दिली होती. चंद्रपूर पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये हे मृतदेह महेश अहिर आणि हरीश धोटे यांचेच असल्याचं कळालं होतं.