उत्तर ध्रुवावर लाखो रेनडियरचे बळी

284

>>मुजफ्फर हुसेन

[email protected]

उत्तर ध्रुवावर टुंड्रा प्रदेशात मोठय़ा प्रमाणात भटके लोक राहतात, ज्यांचे सारे जीवन रेनडियर या प्राण्यावर अवलंबून आहे. रेनडियर हा उत्तर ध्रुवीय जीवनाचा आधार आहे, परंतु बदलत्या तापमानामुळे रेनडियर बर्फात अडकून पडत आहेत आणि त्यातच त्यांचा भुकेने तडफडून मृत्यू होत आहे. दरवर्षी हजारो रेनडियर मरत आहेत. अशा प्रकारे गेल्या दशकभरात लाखो रेनडियरचे मृत्यू झालेले असून हा मानव जातीसाठी अतिशय धोकादायक संदेश आहे.

माणसाने हत्या केल्यास त्याची त्याला शिक्षा देता येते, परंतु निसर्गाने अतिशय क्रूरपणे प्रचंड संख्येने प्राणी ठार केल्यास त्यास काय म्हणावे? दर्शनशास्त्र काहीही म्हणोत, परंतु तब्बल ८ लाख रेनडियर ठार होणे ही काही सामान्य गोष्ट नाही. जगभर खळबळ माजवणारी ही घटना पाहता आज ना उद्या प्रलयाची घटना घडल्यास आश्चर्य वाटायला नको.

उत्तर ध्रुव साऱ्या जगाला परिचित आहे. तेथे बर्फाचा समुद्र आहे. तिथे अशी जागाच सापडत नाही जेथे माणूस राहू शकेल. हवामान नोंदविणारी संपूर्ण यंत्रणा तेथे बेकार ठरते. इकडे आपण हाडे गोठवणारी थंडी म्हणतो, परंतु तिकडे थंडी एवढी असते की त्याचे वर्णन करायला डिक्शनरीत शब्दच मिळत नाहीत. भूगोलाच्या पुस्तकात त्याची केवळ एवढीच माहिती दिलेली आहे की, हा प्रदेश उत्तर ध्रुव म्हणून ओळखला जातो. उत्तर ध्रुवाचाच एक भाग असलेल्या सायबेरिया नावाच्या प्रदेशात बर्फ विरघळण्यामुळे एकीकडे पाण्याची पातळी वाढली तर दुसरीकडे या भागात राहणारा एक विशेष पशू ज्याला रेनडियर म्हटले जाते, त्याला जीवन जगणे अतिशय कठीण झाले आहे. बर्फात अडकून आणि भोजन न मिळाल्याने आतापर्यंत ८० हजार रेनडियर मृत्युमुखी पडले आहेत.

संपूर्ण जगातच हवामान वेगाने बदलत आहे, ज्याच्या फटक्यामुळे या क्षेत्रातील पशुपक्षी मोठय़ा प्रमाणात मृत्युमुखी पडत आहेत. बदलत्या हवामानाने किती पशुपक्षी कायमचेच नामशेष होतील याबद्दल कुणीच काही सांगू शकत नाही. जगासाठी उत्तर ध्रुवावरील सर्वात ओळखीचा पशू बर्फातील अस्वल होय. बर्फाची चादर विरघळल्यामुळे तो आता बेघर झाला आहे. जो काही बर्फ शिल्लक आहे त्यात आज तो कसाबसा जगतोय. बर्फ विरघळण्यामुळे येथे जी दृश्ये दिसून येत आहेत त्यामुळे जग विस्मयचकित होत आहे. उदाहरणार्थ, आजपर्यंत जगाच्या कधीही दृष्टीस न पडलेला विशिष्ट जातीचा पोपट हजारोंच्या संख्येने दिसून आला तो चक्क मृतावस्थेतच. आणखी एक दुसरा प्राणी आढळून आला तो म्हणजे बर्फाळ ससा. हा अमेरिकन सशासारखा बिनशेपटीचा आहे. थंडी आणि बर्फाच्या वादळात तो बर्फाच्या शिखरांपर्यंत जातो. ब्लेरिन नावाचा एक दुसरा पशू आहे ज्याला बर्फात राहणे अतिशय आवडते.

या भागात मोठय़ा प्रमाणात आढळणाऱ्या रेनडियरलाही आता सुरक्षित जागेचा शोध आहे. निव्वळ बर्फाळ प्रदेश असलेला रशियाचा भाग, ज्यात उत्तरी सायबेरियाच्या यामाल प्रांतात रेनडियर मोठय़ा प्रमाणात जन्माला येतात. या पशूंना भयंकर गारठा आणि बर्फाच्या थरांमध्ये जगण्याची सवय आहे. गेली अनेक शतके रेनडियरचे कळपच्या कळप या भागात आढळतात. स्थानिक रहिवासी त्यांचा मोठय़ा आवडीने सांभाळ करतात. त्यांची रीतसर पैदासही करतात. विशेषतः उत्तर पूर्वेकडील भटक्या जमाती अनेक शतकांपासून रेनडियर पाळतात. आज नैसर्गिक परिवर्तनामुळे रेनडियरच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. २००६ मध्ये २० हजार रेनडियरचा भूकबळी गेला होता, नोव्हेंबर २०१३ मध्ये १६ हजार रेनडियरचा भुकेने तडफडून मृत्यू झाला. ही संख्या उपलब्ध रेनडियरच्या एकचतुर्थांश एवढी आहे.  स्थानिक रहिवाशांच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर घटना होती.

संशोधकांच्या मतानुसार रेनडियरचे वैशिष्टय़ असे की, त्याच्या अणकुचिदार खुरांनी ते बर्फाचे थर फोडून काढत असतात. त्यांच्या या वैशिष्टय़ामुळेच स्थानिक रहिवासी रेनडियर पाळतात. त्यावरच त्यांचे जीवनही अवलंबून आहे. २००६ आणि २०१३ मध्ये रेनडियरचे जे मृत्यू झाले त्याचे कारण या काळात या बर्फाळ प्रदेशाचे तापमान वाढलेले होते. एवढेच काय या काळात या भागात मोठय़ा प्रमाणात मुसळधार पाऊसही झाला होता. जसजसे तापमान घसरत गेले तसतसे बर्फ साचणे आणि त्याचे घट्ट होत जाणे वाढले. २०१३ मध्ये २४ तास बर्फवृष्टी होत राहिली. त्यानंतर येथील तापमान उणे ४० डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरले. त्यामुळे इतर वर्षी जसा नरम बर्फाचा थर असे तो राहिला नाही, आहे तो अतिशय कठीण झाला. उकरता येण्याजोगा बर्फ फोडला गेल्यानंतर आत पुन्हा अतिकठीण बर्फाच्या शिळाच होत्या. त्यात हजारो रेनडियर अडकून पडले. या शिळा फोडणे रेनडियरना शक्य नव्हते. त्यामुळे हजारोच्या संख्येने रेनडियरचे मृत्यू झाले.

स्थानिक भटक्या जमातींचे यात फार मोठे नुकसान झाले. संयुक्त राष्ट्रसंघाने मदतीसाठी पाठवलेले मोठे पशूही या टुंड्रा प्रदेशात अडकून पडले. फसलेल्या रेनडियरना खेचून आपल्या कबिल्यात आणणे भटक्या जमातींच्या लोकांना शक्य झाले नाही. अशाप्रकारे खेचून आणण्याचे कसलेही साधन त्यांच्याकडे नव्हते. मरेपर्यंत लोक या अडकून पडलेल्या पशूंची देखभाल करीत राहिले. या स्थानिक भटक्या लोकांना आपल्या संस्कृतीबद्दल मोठे प्रेम आहे. रेनडियर हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यांना असे वाटते की, आपला जीव गेला तरी चालेल, परंतु रेनडियर वाचले पाहिजेत. आपण जगलो आणि रेनडियरचा जीव गेला तर आपण जगायचे कशाच्या भरवशावर असा प्रश्न त्यांना पडतो. आकाशाकडे हात करून ते जेव्हा प्रार्थना करतात तेव्हा त्याचे बोल असतात की आम्ही मेलोत तरी चालेल, देवतेने आम्हाला मारायचे असेल तर आम्ही तयार आहोत, परंतु आमच्या या प्रिय पशूला मात्र काही होऊ नये अशी त्यांची अपेक्षा असते.

कारण वर आकाश आणि खाली बर्फाचे थर या मधल्या जगात त्यांचा एकमात्र आश्रय रेनडियर हा पशूच आहे. त्याच्यावरच त्यांची भाकरी अवलंबून आहे. जीवनाचा सहारा आहे, रेनडियर हेच त्यांचे जग आहे. घरातील, कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्याप्रमाणे रेनडियरच्या मृत्यूवर धाय मोकलून ते रडतात. त्यांचा धर्म, जीवन, सुखदुःख, सारे काही रेनडियरच  आहे. नॅशनल आईसडेट सेंटरच्या अहवालानुसार या वर्षी ऑक्टोबरमध्ये बर्फाच्या वादळांमुळे सारे रेकॉर्ड तुटेल. त्यामुळे यंदा पुन्हा रेनडियरचे मृत्यू न होवोत. तो मरेल की जगेल आणि जगणार असेल तर कसा जगेल हा मोठा प्रश्नच आहे. एका हिंदुस्थानी माणसासाठी गाय, अरबांसाठी उंटाचे जे स्थान आहे तसेच स्थान टुंड्रा प्रदेशातील भटक्यांसाठी रेनडियरचे आहे. गाईच्या पूजेवर कुणी आक्षेप घेऊ शकतो, परंतु रेनडियरच्या पूजेवर कोण कसा आक्षेप घेऊ शकतो!

आपली प्रतिक्रिया द्या