हिमायतनगर येथील पोलीस ठाण्यासमोर जाळून घेणाऱ्या शेख सद्दाम याचा अखेर मृत्यू

225

सामना प्रतिनिधी । नांदेड

हिमायतनगर येथील पोलीस ठाण्यासमोर येवून स्वतःला जाळून घेणाऱ्या शेख सद्दाम शेख अहेमद याचा अखेर आज नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. यामुळे हिमायतनगर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणातील दोषी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा काळे आणि पोलीस नायक संतोष राणे यांना जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी बडतर्फ केले आहे.

पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आठवड्यापूर्वी सद्दाम हा पोलीस ठाण्यात गेला होता, मात्र त्याला बेदम मारहाण झाली होती आणि त्याच्याकडे १७ हजार ६०० रुपये व पाच ग्रॅम सोन्याची अंगठी काढून घेतल्याची तक्रार त्याने दिली होती. मृत्यूपूर्व जबानीत त्याने या बाबी स्पष्ट केल्या होत्या. आज दुपारी तीन वाजता नांदेडच्या शासकीय रुग्णालयात शेख सद्दाम शेख अहेमद याचा उपचार चालू असताना मृत्यू झाला. हे वृत्त आज हिमायतनगरमध्ये पसरताच तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी त्याठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला असून, राज्य राखीव दलाची एक तुकडी नांदेडहून रवाना झाल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, या प्रकरणात शेख सद्दामने दिलेल्या मृत्यूपूर्व जबानीनंतर सहा जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले. त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे याचा अहवाल गेल्यानंतर पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी कर्तव्यात चूक करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा काळे आणि पोलीस नायक संतोष राणे या दोघांना पोलीस सेवेतून बडतर्फ केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या