निर्भयाच्या दोषींना 1 फेब्रुवारीला फासावर लटकवणार

1625

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील (2012 Delhi gang-rape case) आरोपींच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी निर्भयाचा दोषी मुकेश सिंह याची दया याचिका फेटाळून लावली आहे. या दोषींना 1 फेब्रुवारी 2020 ला सकाळी 6 वाजता तिहार तुरुंगात फाशी दिली जाणार आहे. दिल्ली न्यायालयाने आज नव्याने त्यांचे डेथ वॉरंट काढले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर आरोपींनी फाशीपासून बचाव व्हावा यासाठी अखेरचा मार्ग अवलंबवत सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ह याचिका म्हणजेच सुधारणा याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर मुकेश सिंह या दोषीने राष्ट्रपतीकडे दया याचिका दाखल केली होती. मात्र, ती याचिका राष्ट्रपतींनी फेटाळून लावली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने क्यूरेटिव्ह याचिका फेटाळल्याने विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंह यांच्यासह चारही आरोपींना 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येईल. दिल्ली न्यायालयाने नव्याने त्यांचे डेथ वॉरंट जारी केले आहे.

मात्र, 22 तारखेची फाशी पुढे ढकलली जाण्याची चिन्ह निर्माण झाली होती. कारण,  दिल्ली सरकारने गुरुवारी न्यायालयात एक अहवाल दाखल केला होता. या अहवालात त्यांनी मुकेशची याचिका फेटाळून एलजीकडे पाठवण्यात आल्याचे म्हटले होते. त्यामुळे जोपर्यंत राष्ट्रपती दया याचिकेवर निर्णय घेत नाहीत तोपर्यंत दोषींना फाशी देण्यात येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. मात्र, आता ही याचिका राष्ट्रपतींकडून फेटाळून लावण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या