मायलेकाच्या हत्येप्रकरणी नराधमाला फाशीची शिक्षा

13

सामना प्रतिनिधी । नाशिक

दोन वर्षांपूर्वी सातपूरच्या कार्बन नाका परिसरात मायलेकाची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी नराधम रामदास शिंदे याला आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे.

मूळ नगर जिह्यातील राहुरी येथील कचरू विठ्ठल संसारे हे कंपनी कामगार असून, पत्नी पल्लवी (३०), मुलगा विशाल (६) व तीन मुलींसह कार्बन नाका परिसरातील रंगनाथ शिंदे यांच्या खोलीत भाडय़ाने राहत होते. १७ एप्रिल २०१६ रोजी ते रात्रीपाळीच्या कामावर गेले होते. उन्हाळी सुट्टीमुळे तीन मुली बाहेरगावी गेल्या असताना रंगनाथ शिंदे यांचा मुलगा रामदास याने मध्यरात्री घरात घुसून पल्लवीवर अत्याचाराचा प्रयत्न केला, तिने विरोध करीत आरडाओरड केल्याने त्याने चाकूने वार केले. विशाल जागा झाल्याने त्याचीही निर्घृण हत्या करून खोलीस कुलूप लावून तो पसार झाला होता.

कचरू संसारे यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यात १८ एप्रिलला गुन्हा दाखल झाला. तपासाअंती रामदासला अटक करण्यात आली. या खटल्याची सुनावणी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्यासमोर झाली. या खटल्यात २२ साक्षीदार तपासण्यात आल़े सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी काम पाहिले. परिस्थितीजन्य पुराव्यानुसार न्यायालयाने काल २५ एप्रिल रोजी रामदासला दोषी ठरविले. दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद संपल्यानंतर आज रामदासला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या