साईबाबा संस्थान विश्वस्त बरखास्तीचा निर्णय सुप्रीम कोर्टातही कायम

साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या बरखास्तीचा उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला आहे.

सरकारने नवीन विश्वस्त नेमताना राजकीय नसावेत, अशी सूचना सुप्रीम कोर्टाने दिली आहे. एक महिन्यात सरकारला विश्वस्त नेमणुकीसंदर्भात म्हणणे मांडण्याचा आदेश देण्यात आला आहे. शिर्डीतील याचिकाकर्ते उत्तम शेळके यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. ऍड. सतीश तळेकर यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने काम पाहिले.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासन आणि प्रतिवाद्यांना नोटीस पाठविली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात पुन्हा सुनावणी होणार आहे. शिर्डी संस्थानसंदर्भातील दोन याचिका दाखल झाल्या आहेत. आशुतोष काळे आणि इतर पाचजणांची नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली. त्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. सगळ्या मंदिरांमध्ये ट्रस्टींच्या नियुक्त्यांबाबत नियमावली करण्याची गरज आहे. त्यासंदर्भात आज नोटीस जारी केली आहे.