धक्कादायक! बलात्काऱ्याला फक्त पाच जोडे मारण्याची शिक्षा

सामना ऑनलाईन । मेरठ

महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा देण्याची मागणी देशभरातून होत असतानाच मुझफ्फरनगरमधील एका गावात चाकूच्या धाकाखाली तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला पंचायतीने फक्त पाच जोडे मारण्याची शिक्षा दिली आहे. पीडित तरुणीच्या कुटुंबाने यास विरोध दर्शवला असून पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पीडित तरुणी आपल्या कुटुंबासह मुझफ्फरनगर येथे राहते. सदर मुलीच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाची तिच्यावर वाईट नजर होती. यावरून दोन्ही कुटुंबात अनेकवेळा वाद झाला होता. रविवारी रात्री पीडित मुलगी गच्चीत सुकलेले कपडे घ्यायला गेली असता तिथेच दबा धरुन बसलेल्या आरोपीने तिच्यावर हल्ला केला व चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो पळून गेला. पीडित तरुणीने झालेला प्रसंग घरातल्यांना सांगितला. त्यानंतर हे प्रकरण गाव पंचायतीकडे गेले. तरुणीचे म्हणणे ऐकल्यानंतर पंचायतीने आरोपीला फक्त पाच जोडे मारण्याची शिक्षा सुनावली. एवढा गंभीर गुन्हा केल्यानंतरही पंचायतीने आरोपीला फक्त पाच जोडे मारण्याची शिक्षा सुनावल्याने तरुणीच्या कुटुंबाने पंचायतीचा हा निर्णय मान्य करण्यास नकार दिला. तरुणीच्या बहिणीने पोलिसात धाव घेतली व आरोपीवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पीडित तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून आरोपीचा शोध सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या