दसरा मेळावा शिवतीर्थाबाबत आज निर्णय! शिवसेनेची सुधारित याचिका; हायकोर्टात सुनावणी

दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याबाबत उद्या मुंबई उच्च न्यायालयात निर्णय होणार आहे. शिवसेनेने त्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी झाली. परवानगीसाठी महानगरपालिका कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत असल्याने त्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी याचिकेत दुरुस्ती करण्याची परवानगी यावेळी शिवसेनेकडून मागितली गेली. त्यामुळे उद्या सुधारित याचिकेवर सुनावणी होणार आहे.

शिवसेनेच्या वतीने शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी उच्च न्यायालयात ज्येष्ठ काwन्सिल अस्पी चिनॉय व अॅड. जोएल कार्लोस यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती रमेश धनुका आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. शिवसेनेच्या वतीने ज्येष्ठ कौन्सिल अस्पी चिनॉय यांनी बाजू मांडताना सांगितले की, पालिकेच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी याचिकेत दुरुस्ती करणे आवश्यक असून न्यायालयाने तशी परवानगी द्यावी. खंडपीठाने शिवसेनेची मागणी मान्य करत सुनावणी उद्या शुक्रवारपर्यंत तहकूब केली.

1966 पासून दसरा मेळावा होतोय, आताही परवानगी मिळेल ः परब

‘शिवसेनेचा दसरा मेळावा 1966 पासून होत आला आहे. मात्र आता त्यात आडकाठी आणली जात आहे. उद्या न्यायालयात युक्तिवाद होईल आणि शिवतीर्थावर मेळावा घेण्यास उच्च न्यायालय परवानगी देईल.’, असा विश्वास माजी मंत्री अॅड. अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
शिवतीर्थावर परवानगी न मिळाल्यास दसरा मेळाव्यासाठी पर्यायी जागा निवडली आहे का अशा पत्रकारांच्या प्रश्नावर अनिल परब यांनी नकारार्थी उत्तर दिले. शिवसेनेने पर्यायी जागा पाहिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दादर येथे शिवसैनिक आणि बंडखोरांमध्ये झालेल्या संघर्षाचे उदाहरण देत परवानगी नाकारणाऱया महानगरपालिकेच्या निर्णयावरही अनिल परब यांनी टीका केली. संघर्ष फक्त दादरमध्येच होतो का, असे ते म्हणाले. बंडखोरांची सभा वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आहे आणि त्याच वांद्रेमध्ये ‘मातोश्री’ही आहे, मग तिथे तुम्ही कोणता निकष लावाल असेही अनिल परब म्हणाले.

महापालिकेने परवानगी नाकारली

एखाद्या मैदानावर सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यापूर्वी पोलीस विभागाचा अभिप्राय घेणे अनिवार्य ठरते. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडून आलेल्या अभिप्रायानुसार दोन जणांनी परवानगी मागितली असताना एकालाच परवानगी दिल्यास कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे 5 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा घेण्यास परवानगी नाकारण्यात येत असल्याचे परिमंडळ-2 चे उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी शिवसेना आणि शिंदे गट या दोन्ही अर्जदारांना कळवले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे 5 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा घेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज शिवसेनेकडून 22 ऑगस्ट व 5 सप्टेंबर रोजी पालिकेकडे सादर करण्यात आला आहे. तर शिंदे गटाकडून 30 ऑगस्ट रोजी पालिकेकडे दसरा मेळावा घेण्याची परवानगी मागणारा अर्ज करण्यात आला होता.