डॉ. आंबेडकर जयंती, महापरिनिर्वाणदिनी ‘ड्राय डे’ जाहीर करा! शिवसेनेची मागणी

45

सामना ऑनलाईन, मुंबई
१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आणि ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाणदिनी राज्यभरात ड्राय डे जाहीर करावा अशी मागणी सोमवारी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सभागृहनेते यशवंत जाधव आणि स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांच्यासह शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर महापौर दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत महापौर बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि महापरिनिर्वाण दिनाची सर्व तयारी महानगरपालिका निधीतून करण्यात येते. असे असताना मुख्यमंत्र्यांनी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त सोमवारी बैठक लावल्याचे समजले. परंतु या बैठकीला महापौर आणि पालिका प्रशासनातील अधिकाऱयांना बोलावणे अपेक्षित होते, मात्र मुख्यमंत्र्यांनी तसे केले नाही. केवळ समन्वय समिती सदस्यांनाच बैठकीला बोलावले. आंबेडकरी अनुयायी चवदार तळय़ाच्या सत्याग्रहाला ९० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महाडला गेले असताना मुख्यमंत्र्यांनी अशाप्रकारे बैठक घेणे योग्य नव्हते असे सभागृहनेते यशवंत जाधव म्हणाले. पत्रकार परिषदेत सुधार समिती अध्यक्ष बाळा नर आणि बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ हेदेखील उपस्थित होते.

चैत्यभूमीचा विकास शिवसेनेनेच केला
चैत्यभूमीच्या विकासासाठी सातत्याने शिवसेनेनेच पाठपुरावा केला. तसेच त्यासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून दिला, मात्र त्याचे श्रेय राज्य सरकारनेच घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप सभागृहनेते यशवंत जाधव यांनी केला. चैत्यभूमीच्या विकासासाठी महापालिकेने गेल्या वर्षी ८८ लाख १९ हजार आणि यंदा ८९ लाख २० हजार रुपये खर्च केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चैत्यभूमीवर समुद्राच्या लाटांमुळे स्तूपाला तडे जात होते. त्यामुळे १९८८ साली ६० लाख रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. तसेच पुन्हा ५८ लाख रुपयांची मंजुरी देऊन संरक्षक भिंत बांधण्यात आल्याकडे सभागृहनेत्यांनी लक्ष वेधले.

आपली प्रतिक्रिया द्या