
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यासमोर खासदारीची निवडणूक लढवूनच दाखवावी. या मतदारसंघातील शिवसैनिक आणि जनता दीपक केसरकर यांचा पराभव करण्यास सज्ज आहे. विनायक राऊत यांचा या मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. त्यामुळे केसरकर लोकसभेच्या निवडणुकीला रिंगणात उतरल्यास शिवसैनिक त्यांचा पराभव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते तथा मंत्री दीपक केसरकर यांना दिला आहे.
सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासंदर्भात आपल्या नेतृत्वाने जबाबदारी दिल्यास मी ती निश्चितपणे घेईन आणि विद्यमान खासदार विनायक विनायक राऊत यांना पराभूत करेन, असे वक्तव्य गुरुवारी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केले होते. केसरकर यांच्या या वक्तव्याचा शुक्रवारी शिवसेना संजय पडते कुडाळ येथील शाखेत पत्रकार परिषद घेत चांगलाच समाचार घेतला. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख तथा उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, एसटी सेनेचे जिल्हाध्यक्ष अनुप नाईक, नगरसेवक उदय मांजरेकर, युवासेना शहर प्रमुख संदीप म्हाडेश्वर, बंड्या कोरगावकर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री दीपक केसरकर यांनी या मतदारसंघात येत्या लोकसभेची निवडणुकीत लढवून दाखवावी. येथील जनता, मतदार कोण कोणाचा पराभव करतात, हे त्यांना समजेल, असे खुले आव्हान जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केसरकर यांना दिले. संजय पडते म्हणाले की, सावंतवाडी विधानभा मतदारसंघातील जनता केसरकर यांची वाट पाहत आहे. कारण सहा-सहा महिने केसरकर कुठल्याही गावात भेट देत नाहीत. केवळ निवडणूक आली की आश्वासने द्यायची, खोटे बोलायचे पण रेटून बोलायचे अशी केसरकर यांची पद्धत आहे. चष्म्याचा कारखाना, सेट टॉप बॉक्स निर्मिती ही केसरकर यांनीच दिलेली आश्वासने ते विसरले आहेत अशी टीका पडते यांनी केली. विद्यमान खासदार विनायक राऊत हे अगदी दोडामार्ग ते चिपळूण पर्यंत संपूर्ण लोकसभा मतदारसंघात सर्वसामान्य नागरिकांच्या भेटी घेत आहेत. त्यांचा या मतदारसंघात जनसंपर्क दांडगा आहे. या मतदारसंघात गावागावात त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. सर्वसामान्यांचा खासदार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे मतदारसंघातील जनताही त्यांच्या पाठीशी उभे आहे.
सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेजसाठी खासदार राऊत यांनीच प्रयत्न केले. तर दुसरीकडे केसरकर यांनी स्वतःच्या मतदारसंघात काय केले? याचे आत्मचिंतन करावे. स्वतःच्या स्वार्थासाठी केसरकर यांनी किती पक्ष बदलले? असा सवाल जिल्हाप्रमुख पडते यांनी उपस्थित करून तुम्हाला विकासाचे काहीही पडलेले नाही. त्यामुळे मतदारसंघातील लोक तुमची आता वाट पाहत आहेत की, कधी केसरकर येतात. त्यामुळे तुमच्या मतदारसंघातील नागरिक लवकरच तुमचे पार्सल तुमच्या घरी पाठवणार आहेत, असे जोरदार टीकास्त्र जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी मंत्री केसरकर यांच्यावर सोडले.
केसरकरांनी डीएड धारकांना नोकरी देण्याचे काम करावे!
सिंधुदुर्ग जिल्ह्यात डीएड बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असून शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे राज्याचे शिक्षण मंत्री असलेल्या दीपक केसरकर यांनी आधी या डीएड धारकांना नोकरी देण्याचे प्रयत्न करावेत. तसेच दोडामार्गमध्ये रानटी हत्तींचे थैमान असून याबाबत केसरकर मात्र काहीच करत नाहीत अशी टीका जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केली. सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ले तालुक्यामध्ये ज्या कामांचे भूमिपूजन झाले त्याकडे नागरिकांनी पाठ फिरवली. ही सर्व विकासकामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना मंजूर करण्यात आली आहेत. त्यामुळे दीपक केसरकर यांनी या विकासकामांचे श्रेय घेऊ नये असाही टोला जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी लगावला.