किरीट सोमय्यांवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल होणार

गृहनिर्माण क्षेत्रातील ‘अर्थ’ या संस्थेच्या संस्थापक प्रवीण कलमे यांच्याविरोधात निराधार आरोप केल्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा कलमे यांनी दिला आहे. ‘अर्थ’ म्हणजे एसआरए आणि म्हाडातील वसुली गँग आहे’ अशा शब्दांत कलमे यांच्यावर आरोप करणाऱया किरीट सोमय्या यांचे सर्व आरोप कलमे यांनी फेटाळून लावले आहेत.

किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप खोडून काढताना प्रवीण कलमे म्हणाले, परवडणारी घरे व झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणामधील एसआरए प्रकल्पांमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आढळून आला. त्यानंतर आम्ही काही महत्त्वाची कागदपत्रे माहितीच्या आधाराखाली मिळवली. त्यामध्ये असे दिसून आले की शासनाचे शेकडो कोटींचे नुकसान झालेले आहे आणि काही विकासकांनी मोठय़ा प्रमाणात नियमांचे उल्लंघन करून भरपूर नफा कमावलेला आहे. या सर्व गोष्टी निदर्शनात आणून देण्यासाठी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची आम्ही भेट घेतली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांना  2011 पासून मुंबईतील सर्व एसआरए प्रकल्पांमध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळा झाल्याचे निदर्शनास आणून दिले. शासनाचे मोठय़ा प्रमाणात महसुली नुकसान झालेले आहे. त्यासाठी आम्ही त्यांना प्रस्ताव दिला की, या सर्व प्रकल्पांचे जॉइंट इन्स्पेक्शन होणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानुसार जितेंद्र आव्हाड यांनी आमची विनंती मान्य करून त्यांनी त्वरित एसआरएचे सीईओ सतीश लोखंडे यांना ताबडतोब अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.

  • यासंदर्भात त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली असता उच्च न्यायालयानेही यासंदर्भात जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर एसआरएने स्वतः प्रकल्पांचे इन्स्पेक्शन करण्याचे प्रयोजन केले. मात्र यादरम्यान किरीट सोमय्या यांनी वारंवार ट्विट करीत अर्थ संस्था आणि संस्थापक कलमे यांच्यावर बेताल आरोप केले.
  • या ट्विटला कलमे यांच्याकडून उत्तरही देण्यात आले असून त्याचप्रमाणे वकिलामार्फत कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. मात्र त्यावर सोमय्या यांचे कोणतेच उत्तर न आल्याने त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा प्रवीण कलमे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
आपली प्रतिक्रिया द्या