मुंबईत नौदलाची सुकी गोदी, पाकड्यांचं कंबरडं मोडण्याची क्षमता

dry-dock-mumbai

>> रोहन जुवेकर

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

आजपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. या निमित्ताने भारतमातेच्या सामर्थ्याची जाणीव करुन देण्याचा हा एक प्रयत्न आहे. देशाच्या लष्करी सामर्थ्याची नागरिकांना सोप्या भाषेत माहिती देणारा ब्लॉग…

विकसित होण्याचं स्वप्न बघणाऱ्या प्रत्येक देशाला त्याच्या विकास कामांचं रक्षण करण्यासाठी आधी तयारी करावी लागते. ही तयारी पुरेशी असेल तर सुरक्षित वातावरणात वेगाने विकास होऊ शकतो. जगातील सर्वच मोठे देश आर्थिक प्रगती करत असताना लष्करी सामर्थ्य वाढवण्याची काळजी घेत आहेत. या सामर्थ्यामुळे त्यांच्या शब्दाला जागतिक पातळीवर वजन आहे. त्यांच्या देशातून आलेल्या नागरिकांना विदेशात अडीअडचणी आल्यास त्यातून बाहेर पडणे सोपे होत आहे. ही बाब लक्षात घेतली तर विकासाचं स्वप्न बघणाऱ्या हिंदुस्थानसाठी लष्करी सामर्थ्याचं महत्त्व लक्षात येतं.

हिंदुस्थानच्या एका बाजूला पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला चीन आहे. या दोन्ही देशांकडून हिंदुस्थानात हिंसक कारवाया करण्यासाठी दहशतवादी आणि नक्षलवादी यांना मोठ्या प्रमाणावर मदत दिली जात असल्याचे असंख्य पुरावे हाती येऊ लागले आहेत. चीन हिंदुस्थानला कोंडीत पकडण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर नवनवे डाव टाकत आहे. एकाचवेळी एवढ्या आव्हानांचा सामना करत आर्थिक विकास साधू पाहणाऱ्या हिंदुस्थानसाठी लष्करी सामर्थ्य वाढवणं ही अत्यावश्यक बाब आहे.

dry-dock-mumbai1सरकारने ऊर्जा क्षेत्राला प्राधान्य देत आर्थिक प्रगतीला चालना देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. रशिया आणि किर्गिझस्तानच्या खाणींमध्ये गुंतवणूक करुन तिथून दक्षिण हिंदुस्थानपर्यंत सागरी मार्गाने वाहतूक सुरू करण्यासाठी सरकारने करार केले आहेत. या करारांमुळे हिंदुस्थानच्या औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी उपयुक्त खनिजांचा साठा, गॅस, तेल सागरी मार्गाने चेन्नईपर्यंत आणण्याची व्यवस्था तयार होत आहे. ही व्यवस्था सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदुस्थानला नौदलाचे सामर्थ्य वाढवणे खूप आवश्यक आहे. नव्या आव्हानांना पेलण्यासाठी नौदलाने पाणबुडी, युद्धनौका, विमानवाहक नौका, क्षेपणास्त्र, लांब पल्ल्याची मनुष्य विरहीत टेहळणी विमानं अशा वेगवेगळ्या यंत्रणांचा सुरेख मिलाफ साधून एकाचवेळी अरबी समुद्र, हिंद महासागर आणि बंगालचा उपसागर या तिन्ही ठिकाणी वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली आहे.

सामर्थ्य वाढवतानाच नौदलाने नौकांच्या देखभाल आणि दुरुस्तीचा विचार केला आहे. त्यासाठी नौदलाने अरबी समुद्रात देशातली सर्वात मोठी सुकी गोदी अर्थात ड्राय डॉक बांधून काढली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते शनिवारी, 28 सप्टेंबरला या गोदीचं उद्घाटन झालं. एकाचवेळी 3 युद्धनौका किंवा 2 पाणबुड्या किंवा 1 विमानवाहक युद्धनौका इथे देखभालीसाठी ठेवणे शक्य आहे. या कामासाठी 281 मीटरच्या गोदीमध्ये 90, 135 आणि 180 मीटर अंतरावर वेगवेगळे भाग करण्यात आले आहेत. भारताची सर्वात मोठी विमानवाहक युद्धनौका आयएनएस विक्रमादित्य देखील या गोदीत राहू शकते. मुंबईतील नौदलाची सध्याची सुकी गोदी ही वाढत्या नौकांना सामावून घेण्यास अपुरी पडत असल्यामुळे नवीन गोदी बांधण्याचा तसेच सध्याच्या मुंबई नौदल गोदीच्या नूतनीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. या योजनेचा भाग म्हणून ही सुकी गोदी बांधण्यात आली आहे.

dry-dock-mumbai2भारतीय नौदलाने पहिल्यांदाच पाण्यात सुकी गोदी बांधली आहे. या गोदीसाठी जमिनीवरच 15 मीटर उंचीचे काँक्रीटचे ठोकळे तयार करुन समुद्रात नेऊन विशिष्ट कोनात एकमेकांशी जोडण्यात आले. स्टील आणि काँक्रीटचा वापर करुन ही गोदी बांधण्यात आली. या गोदीच्या बाहेरील भागाचा आधार घेऊन एकाचवेळी अनेक युद्धनौका आणि पाणबुड्या सुरक्षितरित्या मुंबई बंदरात ठेवण्याची व्यवस्था आहे. या गोदीचे बांधकाम एचसीसी या पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपनीने केले आहे. नव्या व्यवस्थेमुळे सध्याच्या जमिनीवरील सुक्या गोदीवरचा ताण कमी होईल.

नव्या सुक्या गोदीमुळे वेळच्यावेळी देखभाल, दुरुस्ती करुन नौदलाला पश्चिम तळावरील अर्थात अरबी समुद्रातील आपला ताफा सतत कार्यरत ठेवणे सोपे होईल. नौदलाच्या पश्चिम तळावरील ताफा सक्षम स्थितीत असल्यास त्याचा पाकिस्तानवर कायम दबाव राहील. त्यामुळे नवी सुकी गोदी अरबी समुद्रातील भारताचं सामर्थ्य कायम राखण्यासाठी महत्त्वाची आहे.

सुक्या गोदीचे वैशिष्ट्य

  • 281 मीटर लांब, 45 मीटर रुंद, 17 मीटर खोल
  • 20 कोटी लिटर पाणी सामावून घेण्याची क्षमता
  • 4 सेकंदाला 10 हजार लिटर पाणी उपसणारे आठ पंप
  • अडीच तासात गोदी रिकामी करण्याची क्षमता
  • 5 लाख मेट्रिक टन काँक्रीटचा वापर, वांद्रे-वरळी सी लिंकच्या दीडपट काँक्रीट
  • 8 हजार मेट्रिक टन स्टीलचा वापर, याआधी एवढे स्टील फक्त आयफेल टॉवरसाठी वापरलेले
आपली प्रतिक्रिया द्या