दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘राफेल’पूजन, राजनाथ सिंह फ्रान्सला जाणार

लोकसभा निवडणुकीवेळी ‘पॉलिटिक्स’चा मुद्दा बनलेले राफेल विमान अखेर हिंदुस्थानमध्ये येणार आहे. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह राफेल विमानांची डिलिव्हरी घेण्यासाठी फ्रान्सला जाणार आहे. आठ ऑक्टोबर रोजी पहिले राफेल विमान फ्रान्स हिंदुस्थानच्या ताब्यात देणार आहे. योगायोगाने याच दिवशी विजयादशमी असल्याने पॅरिसमध्ये राजनाथ सिंह शस्त्रपूजन करणार आहेत.

हिंदू परंपरेमध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर शस्त्रपूजन केले जाते. आजही अनेक घरांमध्ये हत्यारांची पुजा केली जाते. त्याअनुषंगाने राजनाथ सिंह दसऱ्याच्या दिवशी पॅरिसमध्ये ‘राफेल’पूजन करणार आहेत. गृहमंत्रीपदाच्या कार्यकाळातही राजनाथ सिंह प्रत्येक दसऱ्याला शस्त्रपूजन करीत होते. आता संरक्षण मंत्री झाल्यानंतरही ते आपली ही परंपरा कायम राखणार आहेत.

पॅरिसमध्ये राजनाथ सिंह फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रो यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते बोर्डेऑक्सला जाणार आहेत. या ठिकाणी त्यांच्याकडे हिंदुस्थानसाठी बनवण्यात आलेले पहिले राफेल विमान सुपूर्द करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या