सैन्य दल देशाच्या भूभागाचे रक्षण करण्यास सक्षम; राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला विश्वास

विजयादशमी म्हणजेच दसऱ्याला शस्त्रपूजन करण्याची परंपरा आहे. विजयादशमीनिमित्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दार्जिलिंगच्या सुकना युद्ध स्मारकात शस्त्रपूजा केली. सध्या हिंदुस्थान आणि चीनमध्ये सीमारेषेवरून तणाव आहे. सीमाभागात शांतता प्रस्थापित करण्याचे हिंदुस्थानचे प्रयत्न सुरू आहेत. या भागात शांतता असावी, हाच आमचा हेतू आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत सैन्य दल देशाच्या प्रत्येक इंच जमिनीचे रक्षण करण्यास सक्षम असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विजयादशमीनिमत्त संरक्षणमंत्री राजनाथ सिंह दार्जिलिंग आणि सिक्कीमच्या दौऱ्यावर आहेत. दार्जिलिंगच्या सुकमा युद्ध स्मारकात त्यांनी शस्त्रपूजा केली. यावेळी लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल एम.एम. नरवणे उपस्थित होते. कोणत्याही परिस्थितीत सैन्य दल शत्रूला देशात घुसू देणार नाही. शत्रू आपल्या एक इंच भूभागावरही ताबा मिळवू शकत नाही, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.

हिंदुस्थान आणि चीन सीमारेषेवर तणाव आहे. तणाव संपून शांतता प्रस्थापित व्हावी आणि दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध आसावेत अशी आमची इच्छा आहे. शांतता स्थापन करण्याची हिंदुस्थानची भूमिका आहे. मात्र, शत्रूने कोणत्याही कुरापती काढल्या किंवा काही आगळीक केली तर त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास सैन्य दल सक्षम आहे, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

गलवान खोऱ्यात चीनने केलेल्या विश्वासघाताचाही राजनाथ सिंह यांनी उल्लेख केला. दोन्ही देशांमध्ये तणाव असताना सैन्य दलाने घेतलेल्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले. सैन्य दलाने धाडसाने या परिस्थितीचा सामना केला. उणे तापमानात आणि प्रतिकूल परिस्थितीतही लष्कराचे जवान सीमेवर तैनात असल्याचे त्यांनी सांगितले. इतिहासात गलवान संघर्षाबाबत हिंदुस्थानी जवानांच्या शौर्याचे वर्णन सुवर्णाक्षरात केले जाईल, असे ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या