गावांना आत्मनिर्भर करण्याचे विखे-पाटील यांचे कार्य प्रेरणादायी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

सत्ता आणि राजकारणाच्या माध्यमातून डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांनी आपले संपूर्ण जीवन लोकांसाठीच अर्पण केले होते. पाणी, शिक्षण आणि आरोग्य या माध्यमातून गावांना आत्मनिर्भर करण्याचे त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राचे प्रकाशन आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा नामविस्तार समारंभ व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून संपन्न झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हर्च्युअल रॅलीत प्रमुख उपस्थिती होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणात विखे-पाटील परिवाराच्या चार पिढय़ांच्या यशस्वी वाटचालीचा विशेष उल्लेख करत, काही पिढय़ांनी आपल्या कामातून सातत्याने पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे. पद्मश्रींनी सहकार चळवळ सुरू केली. याच माध्यमातून पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांनी ग्रामीण लोकांचे दुःख पाहिले. शेतकऱयांना सहकार चळवळीत जोडून ही चळवळ खऱया अर्थाने पुठल्या जातीची आणि धर्माची नसून, सहकार हा निष्पक्ष असतो, हाच संदेश दिला असे पंतप्रधान म्हणाले.

कार्यक्रमास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पेंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील, खासदार डॉ. सुभाष भामरे, डॉ. भारती पवार, प्रीतम मुंडे, धैर्यशील माने, सदाशिव लोखंडे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, भाजप नेते, आमदार हरिभाऊ बागडे, काशिराम पावरा, बबनराव पाचपुते, सुरेश धस, मोनिका राजळे, आशुतोष काळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आण्णासाहेब म्हस्के पाटील, शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरपुटे, वैभव पिचड, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, पोपटराव पवार, सुनंदा पवार, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, अनुराधा नागवडे यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

विखे-पाटील यांनी जनतेचे आयुष्य बदलले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात विखे-पाटील पुटुंबाशी असलेल्या ऋणानुबंधांचा भावनिकतेने उल्लेख करून आठवणींना उजाळा दिला. काँग्रेसने कोंडलेला हिरा शिवसेनेमध्ये घेऊन शिवसेनाप्रमुखांनी तो कोंदणात बसविला, अशा शब्दांत डॉ. बाळासाहेब विखे-पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. मूर्ती छोटी असली तरी त्यांची कीर्ती मोठी होती. विखे-पाटील घराणे जिद्दीने परिस्थितीवर मात करीत पुढे आले. विखे-पाटील यांनी स्वतःचे आयुष्य नाही, तर जनतेचे आयुष्य बदलले. ते भाषणे आणि पुस्तक लिहीत बसले नाहीत, तर त्यांनी आधी केले आणि नंतर सांगितले, असे गौरवोद्गार काढत पक्षीय मतभेद विसरून मी कार्यक्रमास उपस्थित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या