कोल्हापुरात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करा, शिवसेनेचे महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांना निवेदन

शहरात मंजूर कामांव्यतिरिक्त मोठय़ा प्रमाणात निधी अन्य ठिकाणी खर्च केला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनप्रमुख म्हणून सुरू असलेल्या विकासकामांची तपासणी करावी, यात बेकायदेशीर आणि निकृष्ट दर्जाचे काम होऊ नये, याची दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महापालिका आयुक्त तथा प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याकडे करण्यात आली.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाकडून आयुक्त बलकवडे यांना निवेदन दिले.

शहरात विविध विकासकामांसाठी शासननिधी उपलब्ध करून देत आहे. हा सर्व निधी जनतेच्या विविध प्रकारच्या करांतून उपलब्ध होत असतो. त्यामुळे विकासकामांवर होणारा खर्च कायदेशीर असला पाहिजे, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. मात्र, काही महाठग अधिकाऱयांवर दबाव टाकून 40 टक्के रक्कम कशी खाता येईल, यासाठी एका वाघोबाला हाताशी धरत आहेत. त्यामुळे प्रशासनप्रमुख म्हणून शहरात सुरू असलेली विकासकामे आपण तपासावीत, अशी विनंती करत भविष्यात कोणतेही बेकायदेशीर व निकृष्ट दर्जाचे काम झाल्यास न्यायालयात जावे लागेल, असा इशाराही शिवसेना शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी हर्षल सुर्वे, राजेंद्र पाटील, धनाजी दळवी, दिनेश साळोखे, प्रतिज्ञा उतुरे, दीपाली शिंदे, पूनम फडतरे, स्मिता सावंत, सविता कानूरकर, नितीन तळेकर, बाजीराव जाधव, विराज ओतारी, सुहास डोंगरे, सुनील जोशी, अभिजित बुकशेट आदी उपस्थित होते.