रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर, हिंदू महिलेला केले ‘दफन’, तर मुस्लिम महिलेवर ‘दाहसंस्कार’

देशातील सर्वात मोठे रुग्णालय असणाऱ्या दिल्लीतील ‘एम्स’मध्ये गलथान कारभाराचा गंभीर प्रकार समोर आला आहे. एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दोन कोरोना संक्रमित महिलांच्या मृतदेहाची अदलाबदल झाली. हिंदू महिलेचा मृतदेह मुस्लिम कुटुंबाला देण्यात आला तर मुस्लिम महिलेचा मृतदेह हिंदू कुटुंबाला देण्यात आला.

हिंदू कुटुंबाने मृतदेहावर हिंदू परंपरेनुसार दाहसंस्कार केले, तर मुस्लिम कुटुंबाने मृतदेहाला दफन केले. मात्र हा अदलाबदलीचा घोळ समोर आल्यानंतर दोन्ही कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला असून दिल्ली पोलिसात धाव घेतली आहे. यानंतर एम्स प्रशासनाने आपली चूक मान्य केली आहे.

‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, मृत मुस्लिम महिलेचे नाव अंजुमन असून त्या बरेली येथील रहिवासी होत्या. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर 4 जुलै रोजी त्यांना एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र 6 जुलैला रात्री 11 वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने याबाबत कुटुंबियांना रात्री 2 वाजता माहिती दिली.

कब्रस्तानमध्ये मृतदेह दफन करण्याची तयारी करण्यात आली. एम्स ट्रॉमा सेंटरमधून मृतदेह घेऊन एक गाडी कब्रस्तानमध्ये पोहोचली. अखेरचे दर्शन घेण्यासाठी कुटुंबीयांनी चेहरा पाहिला तेव्हा त्यांना धक्काच बसला. अंजुमन यांच्याऐवजी दुसऱ्याच महिलेचा तो मृतदेह होता. कुटुंबीयांनी याबाबत एम्स प्रशासनाला जाब विचारला असता अंजुमन यांचा मृतदेह चुकून एका हिंदू कुटुंबाला दिल्याचे समोर आले. तसेच हिंदू कुटुंबाने त्यावर दाहसंस्कारही केल्याचे समोर आल्याने अधिकच गोंधळ उडाला.

images-4

मृत महिलेचा भाऊ शरीफ खान यांनी याबाबत बोलताना सांगितले की, 6 महिन्यांपूर्वी अंजुमन यांच्या पतीचे निधन झाले होते. त्यांना 3 मुलं असून रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे त्यांना आईचे अंतिम दर्शनही घेता आले नाही. या प्रकरणी एम्स रुग्णालयात तक्रार दाखल केली असता बॉडीगार्ड आणि सुरक्षा रक्षकांनी धमकवल्याचा आरोप शरीफ यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या