प्रदूषण वाढत असेल तर यापुढे जिलेबी खाणार नाही – गौतम गंभीर

1392

नवी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाच्या समस्येबाबत बोलावण्यात आलेल्या संसदीय समितीच्या बैठकीला अनुपस्थित राहून इंदूरमध्ये जिलेबी खातानाचा गौतम गंभीरचा फोटो व्हायरल झाला होता. या मुद्द्यावरून त्याला ट्रोलही करण्यात आले होते. त्यावर स्पष्टीकरण देत गंभीरने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पलटवार केला आहे. माझ्या जिलेबी खाण्याने त्यांना त्रास होत असेल आणि माझ्या जिलेबी खाण्याने प्रदूषण वाढत असेल तर यापुढे मी जिलेबी खाणार नाही असे सांगत केजरीवाल यांनी प्रदूषण कमी होण्यासाठी पाच वर्षात कोणती पावले असा सवालही त्याने केला आहे.

अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही गंभीरने केला. आपण पाच महिन्यांपासून खासदार आहोत. या समस्येबाबत आपण गांर्भीयाने बघत असून समस्या सोडवण्यासाठी पावले उचलल्याचेही त्याने सांगितले. मात्र, पाच वर्षात केजरीवाल यांनी ही समस्या सोडवण्यासाठी काय केले ते सांगावे असे आव्हानही त्याने दिले. या बैठकीबाबतचा ईमेल आपल्याला 11 तारखेला मिळाला. मात्र, माझा क्रिकेटचा कार्यक्रम त्याआधीच ठरला होता. त्यामुळे मला तेथे जावे लागले. या कार्यक्रमामुळेच बैठकीला उपस्थित नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. या बैठकीला आपण उपस्थित राहू शकत नाही,असे आपण कळवले होते असेही त्याने सांगितले.

जनतेने आपल्याला बैठका घेण्यासाठी नाही, तर काम करण्यासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे जनतेसाठी काम करण्यालाच आपले प्राधान्य असल्याचे त्याने सांगितले. केजरीवाल यांनी पाच वर्षात फक्त बैठका घेतल्या आहेत. मात्र, काम काहीच झाले नाही. त्यामुळे बैठका घेण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करण्याला महत्त्व असल्याचे तो म्हणाला. केजरीवाल यांनी दिल्लीतील जनतेला पाणी मोफत दिले आहे. मात्र, ते पाणी पिण्यालायक आहे का, माझे कुटुंब आणि माझी पाच वर्षांची मुलगी दिल्लीतच राहते. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू असे तो म्हणाला. आपल्याविरोधात पोस्टरबाजी करण्यात आणि जिलेबी खाण्याबाबत टीका करण्याऐवजी केजरीवाल यांनी दिल्लीसाठी काम केले असते तर दिल्ली लंडन आणि पॅरिससारखी झाली असती असा टोलाही त्याने लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या