चिदंबरम यांनी लॉकअप क्रमांक 5 मध्ये अख्खी रात्र जागून काढली

969

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

माजी गृहमंत्री, अर्थमंत्री पी चिदंबरम यांना बुधवारी रात्री नाट्यमयरित्या सीबीआयने अटक केली. त्यानंतर त्यांना सीबीआय मुख्यालयात नेण्यात आले. तेथे त्यांची चौकशी करण्यात आली. नंतर त्यांना सीबीआय मुख्यालयाच्या क्रमांक पाच या लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. पण ही संपूर्ण रात्र चिदंबरम यांनी जागून काढली.

आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणात अडकलेले चिदंबरम 27 तासानंतर बुधवारी अचानक मीडियासमोर आले. त्यानंतर त्यांच्या जोरबाग निवासस्थानाला सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी घेरले. पण गेटमधून आत जाणे शक्य नसल्याने काही अधिकाऱ्यांना गेटवरून उड्या मारून चिदंबरम यांच्या घरात प्रवेश करावा लागला. त्यानंतर 52 मिनिटांच्या चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान चिदंबरम मात्र शांत होते. मुख्यालयात नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना प्रकृती विषयक काही प्रश्व विचारले. त्यांचा रक्तदाबही तपासण्यात आला. यावेळी सीबीआय अधिकाऱ्यांनी तुम्ही ठिक आहात ना? असा प्रश्न विचारला त्यावेळीही चिदंबरम शांत होते व त्यांनी मोजक्याच शब्दात आपण ठिक असल्याचे सांगितले.

त्यानंतर त्यांना सीबीआय मुख्यालयातील लॉकअप क्रमांक पाच मध्ये रात्रभर ठेवण्यात आले. यावेळी दोन अधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवून होते. पण संपूर्ण रात्र ते अस्वस्थ होते व झोपले नाहीत. आज सकाळी त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना न्यायालयात नेण्यात येणार आहे. दरम्यान, सीबीआय न्यायालयाकडे चिदंबरम यांची 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मागण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या