मौन बाळगण्यातच न्यायाधीशांचे स्वातंत्र्य- सरन्यायाधीश गोगोईंचा संदेश

295

न्यायसंस्था आणि न्यायाधीशांनी आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग मौन बाळगून घेतला पाहिजे. याचा अर्थ असा नाही की त्यांनी गप्प राहिले पाहिजे. गरज असेल त्यावेळी बोलणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. त्यापलीकडे त्यांनी मौनच बाळगले पाहिजे, असा संदेश सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्यायसंस्था आणि आपल्या सहकाऱयांना दिला. शुक्रवारी त्यांचा न्यायालयीन कामकाजाचा शेवटचा दिवस होता.

न्यायसंस्था आणि सहकाऱयांना संदेश देण्यासाठी सरन्यायाधीश गोगोई यांनी एक निवेदन जारी केले. या निवेदनात म्हटले आहे की, वकिलांना बोलण्याचे स्वातंत्र्य आहे व ते असले पाहिजे. खंडपीठातील न्यायाधीशांनी त्यांचे स्वातंत्र्य मौन बाळगून उपभोगले पाहिजे. कटू सत्य आठवणीत राहिले पाहिजे. मी अशा एका संस्थेशी संबंधित आहे, ज्याची ताकद जनतेच्या विश्वासात आहे. शुक्रवारी ते क्रमांक एकच्या न्यायालयात बसले होते. या वेळी त्यांच्या बाजूला त्यांचे उत्तराधिकारी, नवनियुक्त सरन्यायाधीश शरद बोबडे होते. सर्वोच्च न्यायालयातील वकील संघटनेचे अध्यक्ष राकेश खन्ना यांनी सरन्यायाधीश गोगोई यांना निरोप देताना निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कनिष्ठ न्यायालयांशी संवाद
सरन्यायाधीश गोगोई यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उच्च न्यायालय आणि कनिष्ठ न्यायालयांशी संवाद साधला. उच्च न्यायालयांतील 650 न्यायाधीश आणि 16,500 न्यायालयीन अधिकारी यांना त्यांनी संबोधित केले.

प्रसारमाध्यमांचे आभार मानले
आपल्या कार्यकाळात प्रसारमाध्यमांकडून चांगले सहकार्य लाभले अशा शब्दांत कौतुक करीत सरन्यायाधीश गोगोई यांनी प्रसारमाध्यमांचे आभार मानले. कठीण काळात न्यायसंस्थांच्या प्रतिमेला धक्का देणाऱया खोटय़ा बातम्यांविरोधात प्रसारमाध्यमांनी योग्य भूमिका घेतली असे ते म्हणाले. विशेष म्हणजे गेल्या वर्षी प्रसारमाध्यमांपुढे येऊन पत्रकार परिषद घेणाऱया सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांमध्ये गोगोई यांचा समावेश होता.

आपली प्रतिक्रिया द्या