‘लव्ह यू जिंदगी’ म्हणत तरुणीचा कोरोनाशी लढा! आयसीयू बेड नाही मिळाला

देशभरात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना असून रुग्णालयांत बेड मिळणे कठीण झाले आहे. या अशा कठीण परिस्थिती दिल्लीतील एका रुग्णालयात आयसीयू बेड मिळाला नाही म्हणून कोणतीही तक्रार न करता एक 30 वर्षीय तरुणी ‘लव्ह यू जिंदगी’ म्हणत कोरोनाशी लढा देत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हिंमत न हरता कोरोनाशी लढणाऱया या तरुणीचे अनेकांकडून काैतुक केले जात आहे.

कोरोना महामारीच्या काळात सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यामुळे इतर रुग्णांना या व्हायरसशी दोन हात करण्याची हिंमत मिळतेय. दिल्लीतील एका रुग्णालयात भरती असलेल्या 30 वर्षीय तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही तरुणी स्वतः कोरोनाबाधित असून ती स्वतः याविरोधात लढत असून इतरांनाही या रोगापासून लढण्याची प्रेरणा देत आहे. एकीकडे या तरुणीच्या तोंडावर ऑक्सिजन मास्क लावल्याचे दिसतेय आणि दुसरीकडे ‘लव्ह यू जिंदगी’ गाणेही सुरू आहे. डॉ. मोनिका लंगेह यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या मुलीची इच्छाशक्ती अतिशय मजबूत आहे. आज तिने मला हे गाणे लावण्यास सांगितले आणि मीदेखील तिला गाणे लावून दिले. कधीही हिंमत सोडू नका, अशी शिकवणच या मुलीने दिली असल्याच डॉ. मोनिका लंगेह यांनी म्हटले आहे.

या तरुणीला आयसीयू बेड मिळाला नाही. तरीही गंभीर परिस्थितीत या तरुणीवर कोविड इमर्जन्सीमध्ये उपचार सुरू केले गेले आणि गेल्या दहा दिवसांपासून उपचार सुरू आहेत. सध्या ही मुलगी एनआयव्ही सपोर्टवर आहे. तिला रेमडेसिवीर इंजेक्शन देण्यात आले आहे आणि प्लाझ्मा थेरपीही करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या