आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांत ‘दिल्ली क्राइम’ सर्वोत्कृष्ट, ड्रामा विभागात मारली बाजी

नेटफ्लिक्सच्या दिल्ली क्राइम या वेबसिरीजने आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांत बाजी मारली आहे. सर्वोत्कृष्ट ड्रामा विभागात या वेबसिरिजने पुरस्कार पटकावला असून हा पुरस्कार पटकावणारी ही पहिली हिंदुस्थानी वेबसिरीज ठरली आहे.

एमी पुरस्कार हा टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार समजला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 48 व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळ्याचे यंदा व्हर्च्युअली आयोजन करण्यात आले होते. न्यूयॉर्पमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात पुणीही प्रेक्षक उपस्थित नव्हते. सर्वोत्कृष्ट ड्रामा विभागाच्या श्रेणीत दिल्ली क्राइमची स्पर्धा जर्मनीच्या शैरिटे सीजन 2, ब्रिटनच्या क्रिमिनल युके आणि अर्जेंटिनाच्या द ब्राँज गार्डन सीजन 2 सोबत होती. अखेर या स्पर्धेत रिची मेहता दिग्दर्शित दिल्ली क्राइमने बाजी मारली आहे. याआधी 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट ड्रामा सीरिजसाठी सेव्रेड गेम्ससह चार मोठया वेबसिरिजना नामांकन मिळाले होते. परंतु कोणालाही पुरस्कार मिळालेला नव्हता.

दिल्ली क्राइम ही वेबसिरीज 16 डिसेंबर 2012 मधील दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणावर आधारित आहे. दिल्ली पोलिसांनी तत्परतेने तपास करत काही तासांत मुख्य आरोपीला कसे पकडले हे या सीरिजमध्ये दाखवले आहे. यात अभिनेत्री शेफाली शहाने डीसीपी वर्तिका चतुर्वेदीची भूमिका साकारली आहे. एमी पुरस्कार मिळताच शेफालीने सोशल मिडियावर आनंद व्यक्त केला आहे. तर दिग्दर्शक मेहता यांनी हा पुरस्कार अशा महिलांना समर्पित केला आहे ज्या न केवळ पुरुषांकडून होणारे अन्याय सहन करतात, तर त्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने काम देखील करतात.

सर्वोत्कृष्ट कॉमेडी सिरीज – निनज्युम ता ऑहंडो

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – ग्लेंडा जॅक्सन (एलिझाबेथ इज मिसिंग)

सर्वोत्कृष्ट अभिनेता – बिली ब्रॅट (रिस्पॉन्सिबल चाईल्ड)

सर्वोत्कृष्ट टीवी मूवी – रिस्पॉन्सिबल चाईल्ड

सर्वोत्कृष्ट शॉर्टफॉर्म सीरीज – मार्टी इज डेड

सर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री – सामा

आपली प्रतिक्रिया द्या