हातात, खिशात, हेल्मेटमधून आंबे पळवले; दिल्लीतील लाजिरवाणा प्रकार

संकटात दोन प्रकारचे अनुभव येतात, एकतर माणसातील चांगुलपणा नाहीतर माणसातील पशुता. बुधवारी दिल्लीतील एका भागात लोकांमधील असभ्यतेचे, अमानुषपणाचे दर्शन झाले. दोन जणांच्या वादावादीचा गैरफायदा घेत रस्त्यावरच्या वाटसरुंनी आंब्यांच्या क्रेटमधील सर्व आंबे लुटून नेले. 30 हजार रुपयांचे आंबे डोळ्यासमोर लुटून नेल्याने या व्यापाऱ्याचे प्रंचड नुकसान झाले.

उत्तर दिल्लीच्या जगतपुरी भागातील फळ विक्रेता छोटे हा बुधवारी आंब्याचे क्रेट घेऊन याभागात बसला होता. इतक्यात बाजूला असलेल्या शाळेजवळ वादावादी सुरू झाली. “शाळेजवळ त्यांचे तिथे भांडण सुरू होते. त्यानंतर काही लोक इथे आले आणि मला येथून जाण्यास सांगितले,” असे तो म्हणाला. या परिस्थितीचा फायदा घेत रस्त्यावरून चालणाऱ्या वाटसरूंनी गर्दी करत क्रेटमधील आंबे पळवून नेण्यास सुरुवात केली. त्याने त्या घोळक्याला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र कुणी ऐकेना. हातात येतील तेवढे आंबे लोक नेत होते. काहीं तर हेल्मेट मध्ये आंबे भरून नेले. जवळपास 30 हजार रुपयांचे आंबे लोकं घेऊन पळाले.

आधीच लॉकडाऊनमुळे व्यवसाय सुरळीत नाही, पैसे अडकले आहेत आणि त्यात अशा प्रसंगामुळे कंबरडे मोडले आहे, अशा भावना त्याने व्यक्त केल्या. पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर देखील काही झाले नाही, आता नुकसान कसे भरून काढणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या