दिल्लीतील आंतराष्ट्रीय विमानतळावर नुकतेच लाँच झालेला Iphone16 pro max ची तस्करी करणाऱ्या एका महिलेला अटक केली आहे. ही महिला मंगळवारी हाँगकाँगहून दिल्लीला एकूण 26 मोबाईल फोन घेऊन येत होती. आयफोनची ही सिरीज (Iphone16 pro max ) या महिन्याच्या सुरुवातीला लॉन्च करण्यात आली होती. सध्या महिलेला ताब्यात घेतले असून या प्रकरणाची पुढील चौकशी केली जात आहे.
हाँगकाँगहून दिल्लीला जाणाऱ्या या महिला प्रवाशाने तिच्या व्हॅनिटी बॅगमधून टिशू पेपरमध्ये गुंडाळून हे मोबाईल फोन आणले होते, अशी माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिली. कस्टम अधिकार्यांना आधीच याबाबत गुप्तचर यंत्रणांमार्फत ही या महिलेची माहिती मिळाली होती. त्यामुळे ती महिला विमानतळावर आल्याचे समजताच कस्टम अधिकाऱ्यांनी तिची झडती घेऊन तब्बल 26 आयफोन जप्त केले. तसेच त्या महिलेलाही ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, अटक केलेल्या महिलेच्या विरोधात सीमा शुल्क कायदा (1962) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तस्करीमागे कोण आहेत? याचा शोध घेण्यासाठी कस्टम अधिकारी आता या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करणार आहे.