दिल्ली डायरी – तामीळनाडूतील पोस्टर, मोदी आणि जयललिता!

j-jayalalithaa

>> नीलेश कुलकर्णी

पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जगातील इतर देशांतही सरकारे बनवू शकतात अशा बाता सत्तापक्षाच्या भक्त मंडळींकडून केल्या जातात. मात्र तामीळनाडूमध्ये निवडणूक प्रचाराच्या पोस्टरवरही देशाच्या पंतप्रधानांना मोठे स्थान मिळू शकलेले नाही. मोदी निश्चितच करिश्माई नेते आहेत. त्यामुळे मोदींशिवाय भाजप उमेदवाराचे बॅनर हा कल्पनाविलास वाटेल, पण तामीळनाडूत तसे घडले आहे. तामीळनाडूमध्ये कालच्या विधानसभा निवडणुकीत निर्विवादपणे जयललितांचाच ‘करिश्मा’ दिसून आला. जनमताचा कौल मतमोजणीनंतर समजेल. पण मोदींसारखा नेता असताना जयललितांचा मोठा फोटो बॅनरवर लावून भाजपच्या उमेदवारांना तामीळनाडूत प्रचार करावा लागला या वस्तुस्थितीचे ‘चिंतन’ भाजप करणार का, हा खरा प्रश्न आहे.

द्राविडी व प्रादेशिक अस्मितेभोवतीच तामीळनाडूचे आजवरचे राजकारण पिंगा घालत आले आहे. जयललिता व करुणानिधी या करिश्माई नेत्यांनी तिथे आजवर निर्विवाद वर्चस्व गाजवले. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना या राज्यात कधीही ‘पॉलिटिकल स्पेस’ गवसली नाही. या दोन्ही नेत्यांच्या निधनानंतर ही ‘स्पेस’ भरून काढण्याची नामी संधी दोन्ही राष्ट्रीय पक्षांकडे होती. मात्र आताच्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा ही संधी दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी गमावल्याचे दिसून येत आहे. अण्णा द्रमुक व द्रमुकचा खांदा वापरून चंचुप्रवेश करण्याचे दोन्ही राष्ट्रीय पक्षांचे आजवरचे धोरण राहिले आहे. यावेळी भाजपने तामीळनाडूत स्वतंत्रपणे पाय रोवण्याचे डावपेच खेळले हे खरे. मात्र रजनीकांत यांनी ऐनवेळी घेतलेल्या माघारीमुळे भाजपचा हिरमोड झाला. जयललितांच्या निधनानंतर पोरक्या झालेल्या अण्णा द्रमुकची तशीही ससेहोलपट सुरूच आहे. त्यात भाजपने बळेबळे त्यांच्या गळ्यात युतीची माळ घातली. नरेंद्र मोदींचे अपील तामीळनाडूत होत नसल्याने भाजपसोबतची युती ही गळ्यातील लोढण्याप्रमाणे झाली. भाजपमुळे जोरदार फटका बसेल या भीतीपोटी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी हुशारीने अण्णा द्रमुकच्या प्रचार सामग्रीवर जयाम्मांचा बोलबाला कसा राहील याची तजवीज केली. या पोस्टरवर पंतप्रधानांना स्थान मिळू शकले नाही, मिळाले तरी ते नाममात्र होते. मोदींबद्दलच्या नाराजीचा अण्णा द्रमुकला फटका बसू नये म्हणून पलानीस्वामी यांनी हे पाऊल उचलले. मात्र भाजपात वाजतगाजत दाखल झालेल्या अभिनेत्री कम नेत्या खुशबू सुंदर यांनीही त्यांच्या थाऊजंड लाईटस् या विधानसभा मतदारसंघातील प्रचार सामग्रीवरून चक्क पंतप्रधान मोदींचाच फोटो हटवून त्या जागी जयललितांचा भलामोठा फोटो लावला. जयललितांबद्दल एक सुप्त सहानुभूतीची भावना या निवडणुकीत दिसून आली. गोरगरीबांची ‘अन्नदाती अम्मा’ ही त्यांची इमेज अण्णा द्रमुकच्या बुडणाऱया गलबताला कितपत सावरते हे दिसून येईलच. मात्र, तामीळनाडूतून पोस्टरवरून हटविले जाण्याचा प्रवास ‘दक्षिण ते उत्तर’ झपाटय़ाने होऊ नये याची दक्षता सत्ताधाऱयांनी वेळीच घेतलेली बरी!

योगी ‘वाणी’

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या एका वादात अडकले आहेत. त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी आलेल्या एका सरकारी एजन्सीच्या पत्रकाराचा योगींनी असभ्य भाषेत उल्लेख केल्याने सोशल मीडियावर योगींना चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे. एक हिंदुत्ववादी नेते म्हणून योगी यांची मुख्यमंत्री होण्यापूर्वीची इमेज होती. योगी हे हेकेखोर व उर्मटपणे बोलतात अशा तक्रारी भाजपच्या अनेक लोकप्रतिनिधी व अधिकाऱयांनी वरिष्ठ पातळीवर करून पाहिल्या. मात्र वरिष्ठांनी वेळीच लक्ष न घातल्याने योगींनी आता पत्रकारांना सार्वजनिकरीत्या असभ्य भाषेत बोलण्यापर्यंत मजल मारली आहे. योगींचे हिंदुत्व हे मुळातच संकुचित व फक्त ठाकुरांपुरते मर्यादित असल्याची टीका आता भाजपतील नेतेही करू लागले आहेत. ‘‘यूपी मे केवल ठाकूर राज है’’ अशी टीका भाजपचे नेते खासगीत करत असतात. ‘एन्काऊंटर’ करण्यापासून ते प्रशासनातील ‘पोस्टिंग’पर्यंत सगळीकडे योगी ‘जात’ शोधतात असा आरोप त्यांच्यावर उघडपणे करण्यात येत आहे. योगींमुळे भाजपचा हक्काचा मतदार असलेला ब्राह्मण व ओबीसी वर्गही दुखावला गेला आहे. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वपक्षाचे प्रचंड नुकसान करतील याची जाणीव झाल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी जातीने लक्ष घालून आपल्या विश्वासातील पंतप्रधान कार्यालयातील शर्मा नावाच्या अधिकाऱयांना थेट विधान परिषदेवर पाठवून व त्यांच्या माध्यमातून प्रशासन राबवत योगींना वठणीवर आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कदाचित त्याच नैराश्यातून योगींच्या तोंडून अभद्र शब्द बाहेर पडले असावेत. अर्थातच हिंदुत्वाची बसता उठता जपमाळ करताना आपण एका संवैधानिक पदावर आहोत याचा विसर योगींनी पडू द्यायला नको होता. योगी ‘वाणी’ला दिल्लीकर कसे नियंत्रित करतात ते दिसेलच.

ये आग कब बुझेगी?

आपल्या देशात सातत्याने घडत असलेली एकमेव गोष्ट म्हणजे निवडणुका. देशात कुठे ना कुठे निवडणुकांचे नगारे ऐकायला मिळतातच. कोरोनामुळे लग्नसराईचा ‘बॅंड’ वाजला आहे. मात्र निवडणुकांचे नगारे कोरोना काळातही जोरात सुरू आहेत. गमतीचा भाग म्हणजे कोरोनासारखे जीवनमरणाचे संकट असताना लोकांनाही इंटरेस्ट आहे तो निवडणुकांमध्ये काय होणार यातच. या सगळ्या कोरोना व निवडणुकीच्या धामधुमीत ओडिशाच्या सिमलीपाल जंगलात गेल्या दोनेक महिन्यांपासून आगीचा वणवा भडकलेला आहे. बांधवगडचे जंगल अर्ध्याहून अधिक जळून खाक झालेले आहे. जंगलातील आगीने अक्राळविक्राळ रूप धारण केलेले असताना आपले राज्यकर्ते विविध राज्यांत जाऊन राजकीय सभांचा डंका वाजवत आहेत. आपल्याच राज्यात अशी काही आगबिग लागली आहे हे ओडिशाचे लोकप्रिय मुख्यमंत्री नवीनबाबू पटनाईक यांच्या गावी तरी आहे काय अशी परिस्थिती आहे. एरवी राज्यांच्या कारभारावर बारीक नजर असणाऱया केंद्रातील बलशाली सरकारला ही आग दिसलेली दिसत नाही. ही आग कोणी लावली याची चौकशी तर दूरच, पण ती विझविण्याची कोणतीही तयारी नाही. खाण माफियांना पाय पसरता यावेत यासाठी ही आग पद्धतशीरपणे लावली गेल्याचा पर्यावरण तज्ञांचा आरोप आहे. पाचपैकी चार राज्यांतील निवडणुका आटोपल्यामुळे दिल्लीतील मायबाप सरकारने नवीन सरकारला जागे करत ही आग विझवावी इतकेच!

आपली प्रतिक्रिया द्या