दिल्ली डायरी – भाजपला बंगालप्रेमाचे भरते!

463

>> नीलेश कुलकर्णी

‘मन की बात’मधून पंतप्रधानांचे अधूनमधून देशाला संबोधन होत असते. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेसह सर्वच क्षेत्रांना तडाखे बसलेले आहेत. त्यातून देशाला सावरण्यावरून केंद्र सरकारवर टीका होत असताना आता पंतप्रधानांच्या नव्या मेकओवरविषयी दिल्लीच्या वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्याचा संबंध पश्चिम बंगालच्या आगामी निवडणुकांशी जोडला जात आहे. येनकेनप्रकारेण पश्चिम बंगालमधून ममता बॅनर्जींचा पाडाव करायचा ही दिल्लीश्वरांची महत्त्वाकांक्षा आहे. यासाठी आजवर हरतऱहेचे प्रयत्न झाले. मुकुल रॉयसारखा ममता बॅनर्जींचा अत्यंत जवळचा माणूस भाजपने गळाला लावला. ‘फोडा आणि झोडा’ नीती जोरात वापरली. हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचे कार्ड खेळले गेले. अर्थात त्याचा काहीच फायदा भाजपला झाला नाही असेही नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपला त्याचा नक्कीच फायदा झाला. मात्र ममता बॅनर्जीं यांना हरवणे इतके सोपे नाही. ममता यांनी बंगालमध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या डाव्यांना भुईसपाट केले. त्यामुळे ममतांचा पाडाव करणे सहजासहजी शक्य नाही याची जाणीव दिल्लीश्वरांनाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बंगालच्या अस्मितेवर आक्रमण करत असल्याची बोंब मारून ममतादीदींनी अगोदरच वातावरण पेटवले आहे. पश्चिम बंगालमध्ये ममतांना टक्कर देण्याएवढय़ा ताकदीचा नेता भाजपकडे नाही. त्यामुळे मूळच्या बंगालच्या असलेल्या त्रिपुराच्या बिप्लव देवांकडून बंगाली अस्मितेला चुचकारण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र अशा चुचकारण्याला बंगाली जनता धूप घालेल काय, हा खरा प्रश्न आहे. कमरेला पदर खोचून रणांगणात लढण्याची धमक ममतांमध्ये आहे. पुढल्या वर्षी उन्हाचा पारा टिपेला पोहोचल्यानंतर बंगालात निवडणुका होतील. त्याची तयारी आतापासूनच सुरू झाली आहे. बिप्लव देव यांच्यासह भाजपच्या नेत्यांना आलेले बंगालप्रेमाचे भरते हे निवडणुकीवर डोळा ठेवूनच आहे. अर्थात, असे बेगडी प्रेम सर्वच राजकीय पक्ष दाखवत असतात. काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनीही पूर्वी गुजराती आणि बंगाली अशी तुलना करीत वाद निर्माण केला होताच. राजकारणासाठी या गोष्टी होत असल्या तरी सामान्य मतदार त्याला किती महत्त्व देतो हेच शेवटी निवडणुकीत महत्त्वाचे ठरते.

विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ

देशातल्या विद्यार्थ्यांपासून ते कॉलेज स्टुडंट्सपर्यंत ज्यांच्या हाती या सगळ्यांचे भवितव्य आहे असे मनुष्यबळ विकास मंत्री कोण आहेत, असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे. कारण या देशाला गोविंद वल्लभ पंत, नरसिंह राव आणि डॉ. मुरली मनोहर जोशी अशा विद्वान मनुष्यबळ विकास मंत्र्यांची मोठी परंपरा आहे. त्यात सध्याचे ‘कवी’ म्हणवून घेणारे मनुष्यबळ विकास मंत्री कोणत्या पठडीत बसतात, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे परिस्थिती भयंकर झालेली असताना ‘सोशल डिस्टिन्सिंग’ राखा, असे एकीकडे पंतप्रधान तळमळीने सांगत असतात. मात्र मनुष्यबळ विकास खाते आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱया विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा जणू चंगच बांधला आहे. परीक्षा घ्यायच्याच या इरेला पेटून हे खाते काम करीत आहे. ‘निशंक’ या टोपणनावाने कविता लिहिणारे रमेश पोखरियाल हे सध्या मनुष्यबळ विकास खाते सांभाळत आहेत. पोखरियाल हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते तेव्हापासूनच वादग्रस्त आहेत. त्यांच्या कारभाराविरोधात भाजपचेच तेथील माजी मुख्यमंत्री आणि सचोटीचे नेते बी.सी.खंडुरी यांनी मोहीम उघडली होती. त्यामुळे मोदींच्या पहिल्या सरकारात निशंक यांना मंत्री बनता आले नाही. आता खंडुरींची रवानगी ‘मार्गदर्शक मंडळा’त केल्यानंतर निशंक यांचा मंत्रीपदाचा मार्ग प्रशस्त झाला. मात्र कोरोना काळातही पदवी विद्यार्थ्यांना परीक्षा घ्यायला लावून संकटात टाकण्याचा विडा उचलणारे मंत्री अशी त्यांची प्रतिमा होत आहे. मनुष्यबळ विकास खात्यासंदर्भात कोणताही निर्णय झाल्यानंतर ‘थँक्यू होम मिनिस्टर’ असे अगदी नम्र असे ट्विट करण्याचे ‘महान कार्य’ सध्या देशाचे शिक्षणमंत्री करत आहेत. अशी परिस्थिती असल्यानंतर ‘शिक्षणाच्या आयचा घो’ व्हायला कितीसा वेळ लागणार आहे?

गेहलोत यांचे ‘संकटमोचक’

राजस्थानचा राजकीय मुकाबला एखाद्या ‘ट्वेंटी ट्वेंटी’ मॅचच्या ‘सुपरओव्हर’प्रमाणे रोचक आणि रंजक झाला आहे. देश कोरोनाशी लढत असताना दिल्लीश्वरांनी सचिन पायलट यांच्या माध्यमातून अशोक गेहलोत यांचा ‘कमलनाथ’ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सध्या तरी गेहलोत हे सर्वांना पुरून उरले आहेत. एकेकाळी जादूचे प्रयोग करणारा हा माणूस राजस्थानमध्ये तिसऱयांदा मुख्यमंत्री झाला त्यामागे त्यांचा मोठा संघर्ष आहे. राजकारणात ते पक्के मुरलेले आहेत. काँग्रेसच्या दिल्ली वर्तुळात सध्या के. सी. वेणुगोपाळ या नावाचा मोठा बोलबाला आहे. राहुल गांधींचे खासमखास ही त्यांची ओळख! सचिन पायलट भविष्यात बंड करणार हे चाणाक्ष गेहलोत ओळखून होते. त्यामुळे त्यांनी मोठय़ा हुशारीने वेणुगोपाल यांना राजस्थानातून राज्यसभेवर पाठवून त्यांच्याशी वैयक्तिक स्नेह निर्माण केला. वेणुगोपाळ यांच्यासाठी राजस्थान हा नवखा असताना गेहलोत यांनी ‘पुढची गणिते’ ओळखून त्यांना या राजकीय तिढय़ात सक्रिय केले. मध्यरात्री वेणुगोपाल यांना जयपूरला आणण्यासाठी खास विमान पाठविण्यात आले. नाराज काँग्रेस आमदारांची भेट घालून दिली. त्याचा फायदा कितपत होईल हे माहीत नाही, मात्र सचिन पायलट हे राहुल गांधींच्या जवळचे आहेत, त्यांचा काटा सहजासहजी काढता येणे शक्य नाही हे माहीत असल्याने गेहलोत यांनी वेणुगोपाल यांच्या नथीतून अचूक तीर मारला. पायलट यांना पदांवरून काढण्याचा राहुल गांधींचा मानस नव्हता. मात्र, गेहलोत यांनी मुत्सद्दीपणे ते करून दाखविले. तूर्त तरी वेणुगोपाल हे गेहलोत यांचे संकटमोचक ठरले आहेत. पुढे व्हायचे ते होईल.

आपली प्रतिक्रिया द्या