धोनीने ‘आयपीएल’मध्ये ठोकले दोनशे षटकार

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत 200 षटकार ठोकणारा पहिला हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या लढतीत रविवारी ही उपलब्धी मिळविली. याचबरोबर आयपीएलमध्ये चार हजार धावांचा टप्पा गाठणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे.

धोनीने घाबरविले होते!

‘महेंद्रसिंग धोनीची आक्रमक फलंदाजी पाहून आम्ही खरंच घाबरलो होतो. धोनीने या लढतीत तेच केले, ज्यासाठी त्याला ओळखले जाते. त्याची फटकेबाजी पाहून आता सामना हातातून निसटला असेच मला वाटले होते. अशा अनेक चुरशीच्या लढती आम्ही गमावलेल्या होत्या. मात्र, यावेळी एका धावेने जिंकल्याने आनंद झाला. नवदीप सैनीने 19व्या षटकात टिच्चून गोलंदाजी केली म्हणून आम्ही चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध विजय मिळवू शकलो.’
विराट कोहली -कर्णधार, बंगळुरू

गेल, डिव्हिलियर्सच धोनीच्या पुढे
‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱया फलंदाजांच्या यादीत महेंद्रसिंग धोनी तिसऱया स्थानावर आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ख्रिस गेलने 121 सामन्यांत सर्वाधिक 323 षटकार लगावले असून दुसऱया स्थानावर असलेल्या बंगळुरूच्या एबी डिव्हिलियर्सने 150 सामन्यांत 204 षटकार ठोकले आहेत. महेंद्रसिंग धोनीने 184 सामन्यांत 203 षटकार लगावले आहेत. याचबरोबर धोनीने बंगळुरूविरुद्ध नाबाद 84 धावांची खेळी करीत कर्णधार या नात्याने 4000 धावांचा टप्पाही ओलांडला. धोनीने 168 आयपीएल सामन्यांत नेतृत्व करताना 4040 धावा फटकावल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या