दिल्ली डायरी – चन्नी हेच ‘ट्रम्पकार्ड’ ठरतील काय?

>> नीलेश कुलकर्णी  

पंजाब विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले आहे. याचा निकाल कळायला 10 मार्च उजाडणार आहे. तथापि एकूण प्रचार काळात पंजाबमध्ये दलित समाजातील नेत्याला मुख्यमंत्रीपद देण्याचे काँगेस नेते राहुल गांधी यांनी दाखविलेले राजकीय धाडस त्या पक्षाला पुन्हा पंजाब जिंकून देऊ शकते, अशी परिस्थिती दिसून आली.  चन्नी हे काँग्रेससाठी ट्रम्पकार्ड ठरतील का? हेदेखील 10 तारखेलाच समजेल. सुरुवातीला अगदीच ओव्हररेटेड वाटणाऱ्या चन्नी यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर विरोधकांबरोबरच नवज्योतसिंग सिद्धूसारख्या स्वपक्षीयांची कोंडी केली. त्यामुळे त्यांना पुन्हा लॉटरी लागली तर आश्चर्य वाटायला नको.

पंजाब विधानसभा निवडणुकीचा निकाल आता ‘ईव्हीएम बंद’ झाला आहे. निकालाबाबत उत्सुकता असली तरी काँगेसचे पारडे जड वाटत आहे. शेतकऱ्यांच्या प्रखर विरोधामुळे भाजपला स्थान उरलेले नव्हते. तिकडे भाजपसोबत ‘असंगाशी संग’ केल्याने माजी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग ‘पंजाबात राष्ट्रीय पक्षाचे सरकार सत्तेवर यावे’, असे हताश उद्गार काढत होते. अकाली दल तर सत्ता स्पर्धेच्या आसपासही दिसले नाही. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात उत्तर प्रदेश व बिहारच्या नागरिकांच्या घुसखोरीविषयी जाणीवपूर्वक वादग्रस्त विधान करून मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांनी ‘एकाच दगडात अनेक पक्षी’ मारले. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला कमावण्या आणि गमावण्यासारखे काहीही नसल्याने चन्नीच्या विधानाचा तिकडे काही फरक पडणार नाही. मात्र पंजाबच्या प्रादेशिक अस्मितेविरुद्ध दिल्लीचा बनिया नेता, असा या लढाईला रंग देण्यात चन्नी यशस्वी ठरले. हे सगळे घडत असतानाच आम आदमी पक्षाचे माजी नेते कवी कुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्या मनात खलिस्तानच्या निर्मितीची राष्ट्रद्रोही षड्यंत्रे शिजत असल्याचा गंभीर आरोप केला होता. हा आरोपही भाजपला फायदेशीर ठरण्याऐवजी काँग्रेसलाच मदतगार सिद्ध होणार आहे. कधीकाळी छोटा काँग्रेस कार्यकर्ता असलेले चरणजितसिंग चन्नी हे या विधानसभा निवडणुकीत पंजाबच्या राजकारणातले ‘ट्रम्प कार्ड’ ठरले आहेत. एरव्ही नियोजनाबाबत सावळा गोंधळ असलेल्या काँगेस पक्षाने पंजाबमध्ये कधी नव्हे नियोजनबद्ध निवडणुकीचा डाव टाकला आहे. आता चन्नी किती पारडे फिरवतात ते 10 मार्च रोजी दिसेलच.

चरणजितसिंग चन्नी अपघाताने पंजाबचे मुख्यमंत्री बनले खरे, मात्र त्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने राजकीय डावपेच खेळले ते पाहून भल्याभल्यांच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले आहेत. पंजाबच्या राजकारणात डेरा सच्चा सौदाची महत्त्वाची भूमिका असते. वादग्रस्त बाबा रामरहीमला पॅरोलवर बाहेर काढून भाजपने ‘पवित्र’ करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचवेळी चन्नी यांनी थेट बाबांच्या व्याह्याशी सूत जुळवले त्याच वेळी रविदासी पंथ आणि दलित समाजातील विविध संघटनांचा पाठिंबा मिळविण्यातही ते यशस्वी ठरले. डेराचा संदेशही या वेळी स्पष्ट नाही. डेरामध्ये दुफळी माजली होती. त्याचा फायदा चन्नींनी उचलला. बाबा रामरहीमला बाहेर काढून आणि पंतप्रधानांनी गुरुद्वारात जाऊन भजनात सामील होऊन जे साध्य झाले नाही ते चन्नी यांनी जागोजागी गुरू ग्रंथ साहिबाचा अखंड पाठ करून साध्य करून दाखविले. अंगावर शाल ओढत चन्नी विविध ठिकाणी पाठाचे पठण करतात, थोडे अश्रू ढाळतात आणि पुढे चालायला निघतात, असे चित्र दिसले. भावनिक राजकारणात त्यांनी इतरांना मागे टाकले. पंजाबात सध्याच्या घडीला काँग्रेस सर्वात आघाडीवर आहे. चन्नी यांनी बाजी मारली तर त्याचे श्रेय त्यांच्या व काँग्रेसच्या रणनीतीला जाणार आहे. पंजाब पुन्हा पादाक्रांत केले तर काँग्रेससाठी ती ‘नवसंजीवनी’ ठरेल.

अश्विनीकुमारांचा राजीनामा

कोण हे अश्विनीकुमार, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. तुम्हालाच नाही तर काँग्रेसमधील अनेकांनाही अश्विनीकुमार कोण, हा प्रश्न पडला असेल, मात्र हे महाशय मनमोहनसिंग सरकारमध्ये राज्यमंत्री होते. वकील वगैरेही आहेत. त्यांनी काँग्रेसचा मध्यंतरी राजीनामा दिला. ते ज्या पंजाब प्रांतातून येतात तिकडे काँग्रेसची वाताहत होईल. काँग्रेसच्या नेतृत्वात दम उरलेला नाही, अशी शापवाणीही अश्विनीकुमार यांनी जाता जाता केली आहे. वास्तविक ‘काँग्रेसमुक्त हिंदुस्थान’ म्हणता म्हणता ‘काँग्रेसयुक्त भाषणे’ सध्याचे केंद्रातील सत्ताधारी करत आहेत. सत्ताधाऱ्यांना काँग्रेसशिवाय करमत नाही, अशी स्थिती असताना अश्विनीकुमार यांना कितपत गांभीर्याने घ्यायचे? मुळातच कोणताही राजकीय वकूब नसताना केवळ घालीन लोटांगण या पद्धतीने अश्विनीकुमार राजकारणात पुढे आले. गुरूदासपूरमधून त्यांच्यात व काँग्रेस नेते प्रतापासिंग बाजवा यांच्या आडवा विस्तव जात नाही. अर्जुनसिंग पंजाबचे राज्यपाल झाल्यानंतर त्यांनी अश्विनीकुमार यांना हात दिला. पुढे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांना राज्यसभेवर आणले आणि मंत्रीही केले. कसलाही जनाधार नाही. पक्षासाठी योगदान नाही, असे असताना सर्व काही उपभोगून अश्विनीकुमार काँग्रेसबाहेर पडले. त्यांना स्वतःच्या चिंरजिवासाठी विधानसभेचे तिकीट हवे होते. ते मिळाले नाही. त्यामुळे त्यांना काँग्रेस ‘नकोशी’ वाटू लागली. बाकी काही नाही.

केशवप्रसाद चक्रव्यूह भेदणार का?

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य सिराधू मतदारसंघातून विजयी होतील की नाही, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. उपमुख्यमंत्री असताना केशवप्रसाद यांनी बऱ्यापैकी काम केले आहे, मात्र भाजपचे अंतर्गत राजकारण इतके बरबटले आहे की, एकमेकांची वासलात लावण्यासाठी भाजप नेते कोणत्याही थराला जात आहेत. अनुप्रिया पटेल यांच्या अपना दलमध्ये भाजपने अगोदरच फूट पाडून त्यांना आई आणि बहीण पल्लवीपासून वेगळे केले आहे. अर्थात कुटुंबातील अंतर्गत वादही त्यास कारणीभूत होते. उत्तर प्रदेशमध्ये भाजपची अवस्था बिकट झाल्याने अनुप्रिया पटेल यांनीही भाजपवर डोळे वटारण्यास सुरुवात केली होती, मात्र अमित शहा यांनी ‘चार गोष्टी’ समजावल्याने त्या भाजपच्या प्रचारांत दिसत आहेत. सिराधूमधून केशवप्रसादांचा अर्ज भरतानाही त्या बरोबर होत्या. त्या वेळी केशव प्रसाद ही निवडणूक आरामात जिंकतील, अशी स्थिती होती, मात्र अचानक अनुप्रियांशी भांडण झालेल्या भगिनी पल्लवी यांनी अपना दलच्या बंडखोर गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरल्याने केशवप्रसाद यांना घाम फुटला आहे. समाजवादी पक्षाच्या चिन्हावर त्या निवडणूक लढवित असल्याने त्यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी केशवप्रसाद यांनी ‘गुप्त भेट’ घेऊन त्यांना समजावलेही. पल्लवी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे जवळपास निश्चित झाले असतानाच अचानक गोरखपूरच्या मठातून एक फोन आला आणि पल्लवी यांना जी पाहिजे ती मदत आपण करू, तुम्ही लढा आणि जिंका, असा ‘आशीर्वाद’ही मठातून कोणी ‘बाबा’ नावाच्या महाराजांनी दिला म्हणे! त्यामुळे केशवप्रसाद आता कुर्मी आणि दलितबहुल अशा सिराधूच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. ‘भावी मुख्यमंत्री’ अशी केशवप्रसादांची तयार होत असलेल्या फुग्याला गोरखपूरच्या मठाने सध्या तरी टाचणी लावली आहे.

[email protected]