दिल्ली डायरी – आसामच्या निवडणुकीत काँग्रेसचे कमबॅक!

>> नीलेश कुलकर्णी

आसामची सुरुवातीला एकतर्फी वाटणारी आणि भाजपच्या बाजूने झुकलेली विधानसभा निवडणूक अचानक आता काँग्रेसच्या बाजूने कलंडल्यासारखी दिसते आहे. नागरिकता संशोधन विधेयक, हे या निवडणुकीत भाजपसाठी ‘गले की हड्डी’ बनणार, असे भाकीत सुरुवातीपासूनच वर्तवले जात असताना, आसामच्या रणांगणात काँग्रेसने कधी नव्हे ते धोरणी डावपेच टापून सेक्युलर मतांची फाटाफूट न होऊ देण्याची चाल खेळल्याने भाजपच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

आसामच्या निवडणुकीत प्रारंभी बॅकफूटला वाटणाऱया काँग्रेसने आता ‘कमबॅक’ केल्याचे चित्र निर्माण झाले आहे. असे असले तरी, निकालानंतर निवडून येणारे आमदार ‘सुरक्षित’ राखण्याचे मोठेच ‘आव्हान’ काँग्रेसपुढे असणार आहे. एआययूडीएफसोबत आघाडी केल्याने काँग्रेसची बाजू या निवडणुकीत आता किंचित वरचढ दिसते आहे. मात्र, हे युद्ध जिंकले तरी काँग्रेस तहात ते शाबूत राखेल काय, हा प्रश्न आहेच. कारण काँग्रेसच्या संभाव्य आमदारांची सुरक्षित स्थळी म्हणजेच जयपूरला रवानगी करण्याची योजलेली योजना. आमदारांच्या अशा वारंवारच्या ‘खातीरदारी’मुळे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेसचे ‘परमनंट संकटमोचक’ ठरत आहेत. आसामात आमदारांच्या खरेदी-विक्रीचा मोठा बाजार 2 मेनंतर भरण्याची शक्यता आहे. यापूर्वीचा राजस्थान व गोव्याचा अनुभव लक्षात घेऊन काँग्रेसने नवोदित आमदारांसाठी आताच ‘जयपूरचा पाहुणचार’ आयोजित केल्याच्या बातम्या येत आहेत. विशेषतः तरुण गोगईंसारखा टोलेजंग नेता नसतानाही काँग्रेस जिंकली तर पक्षासाठी ती मोठीच राजकीय संजीवनी ठरेल. आसामची यंदाची निवडणूक एकमेव नेत्याभोवती फिरत राहिली ती म्हणजे तिथले भाजपचे ताकदवान मंत्री हेमंत बिस्व सरमा. सरमांची राजकीय महत्त्वाकांक्षा जबरदस्त आहे. सरमा पूर्वी काँग्रेसमध्ये होते. त्याचवेळी काँग्रेसने त्यांच्या महत्त्वाकांक्षेकडे गांभीर्याने पाहिले असते तर आज पूर्वोत्तर राज्यात काँग्रेस नामशेष झालेली दिसली नसती. त्याच सरमांना भाजपात घेऊन अमित शहांनी त्यांच्या क्षमतेचा खुबीने वापर करून घेतला. पूर्वोत्तर भागातील अनेक राज्यांत भाजपने जो सत्तेच्या राजकारणात चंचूप्रवेश केला आहे, त्यामागचे खरे सूत्रधार सरमा हेच आहेत. आसामचे विद्यमान मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल व सरमा यांच्यात ‘छत्तीसचा आकडा’ आहे. कााँग्रेसमध्ये असताना त्यांचा तेव्हाचे मुख्यमंत्री तरुण गोगईंसोबत असाच छत्तीसचा आकडा होता. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाची संधी मिळत नाही म्हटल्यानंतर त्यांनी भाजपची वाट पकडली. भाजपातही त्यांची घुसमट झाली असली तरी, भाजप नेतृत्वाने चलाखीने यंदाच्या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नाही. परिणामी सोनोवाल व सरमा यांच्यात आपापले समर्थक निवडून आणण्याची शर्यत राहिली. अर्थात भाजपला संपूर्ण बहुमत मिळाल्यास आपल्याला मुख्यमंत्रीपद दिले जाणार नाही याची जाणीव असल्याने तोडापह्डीच्या राजकारणातले ‘मास्टर माइंड’ असणाऱया सरमा यांनी भाजपच्या उमेदवारांचा अनेक ठिकाणी ‘भीतरघात’ केल्याचे मानले जात आहे. विशेषतः सोनोवाल समर्थक उमेदवार कसे पडतील अशी रणनीती सरमा यांनी आखल्याने भाजपचे नुकसान होण्याची शक्यता आहे. भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर सरमा कोणत्याही पक्षातून आमदार खेचून आणू शकतात, तशी त्यांची ‘ख्याती’ आहे. त्यामुळेच सरमांनी आपल्याच पक्षावर मोठा ‘डाव’ टाकला आहे. यात ते यशस्वी होतात की, हा डाव त्यांच्यावरच उलटूनच काँग्रेसच्या हाती सत्तेचे ‘आयतेच घबाड’ हाती लागते, हे यथावकाश कळेलच.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या