दिल्ली डायरी : बिहारमधील पेल्यातील वादळ

743

>> नीलेश कुलकर्णी

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना त्या पदावरून हटविण्यासाठी राज्यातील भाजपच्या नेत्यांनी कुजबूज मोहीम आखली खरी, मात्र त्याचे तीव्र पडसाद बिहारमध्ये उमटले. त्यामुळे सुशासनबाबू नितीशकुमारच आमचे ‘कॅप्टन’ असतील असा निर्वाळा त्यांचे ‘डेप्युटी’ असलेल्या भाजपच्या सुशीलकुमार मोदी यांना द्यावा लागला. तेव्हा तूर्त तरी बिहारमधील हे पेल्यातील वादळ पेल्यातच थंडावले आहे. नितीशबाबूंचे ‘ओझे’ भाजपला जड झाले असले तरी ते दूर करणे त्यांना राजकीयदृष्टय़ा परवडणारे नाही. त्यामुळेच संजय पासवान आणि गिरिराज सिंह यांच्यासारख्या नेत्यांनी दिलेला ‘पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच’ हा नारा त्यांच्याच पक्षाच्या सुशीलकुमार यांनी टोलवला हे बरे झाले.

लालू यादव यांच्या मस्तवाल आणि भ्रष्ट सत्तेला सुरुंग लावत नितीशकुमार यांनी बिहारात एक ‘राजकीय क्रांती’ घडवली. त्याचवेळी विकासाच्या बाबतीतही चांगले काम केले आहे. त्यामुळेच बिहारसारख्या राज्यात जनतेने तब्बल सहा वेळा त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली. त्यामागे नितीशबाबूंची मोठी तपश्चर्या आहे. लालूंसारख्या नेत्यापुढे भल्याभल्यांचा टिकाव लागला नाही. ती करामत नितीशबाबूंनी करून दाखवली. इतकेच नाही तर जनतेच्या मनातही लालू यांना अप्रिय केले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची राज्यातील भाजप नेत्यांना आलेली उबळ दिल्लीश्वरांनी डोळे वटारल्यावर दाबून धरावी लागली आहे. नितीशकुमार यांच्या सोबतचा ‘राजकीय घटस्फोटा’चा अनुभव भाजपसाठी फारसा चांगला नाही. जीतनराम मांझींचेही त्यामुळे मोठे राजकीय वाटोळे झाले हा इतिहास आहे. त्यामुळे नितीशबाबूंचे ओझे जड झाले असले तरी सांगता येत नाही आणि सहनही करता येत नाही अशी अवस्था बिहारमधील भाजपच्या नेत्यांची झाली आहे.

नितीशबाबू 15 वर्षे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आता त्यांनी भाजपचा मुख्यमंत्री होण्यासाठी मार्ग मोकळा करावा अशी मागणी करून अडगळीत पडलेले भाजप नेते संजय पासवान यांनी नव्या चर्चेला मध्यंतरी तोंड फोडले होते. गिरिराज सिंह यांच्यासारख्या बेताल नेत्यानेही त्याचीच री ओढली होती. त्यामुळे बिहारातील भाजप-संयुक्त जनता दलाचा गुण्यागोविंदाने चाललेला राजकीय संसार विस्कटतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र भाजपचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनीच नितीशबाबूंवर स्तुतिसुमने उधळल्याने पेल्यातील वादळ पेल्यातच शमले आहे. ‘नितीशबाबू जबरदस्त कॅप्टन आहेत. ते चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत असताना कॅप्टन बदलण्याचा प्रश्न येतोच कुठे?’ असा सवाल करून सुशीलकुमार यांनी सारवासारव केली. अर्थात, यानिमित्ताने भाजपच्या मनातील सुप्त आकांक्षा नितीशबाबूंच्याही कानी गेल्या हेही एका अर्थाने बरे झाले. मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा कोणत्याही पक्षाने बाळगण्यात गैर नाही, मात्र एखाद्या नेत्याने मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर पक्की मांड ठोकलेली असताना त्याचे बूड अस्थिर करणे हे न्यायाला धरून नाही. बिहारात तशीही नितीशबाबूंची खुर्ची खेचणे लालूंसारख्यांना जमले नाही. त्यात बिहारच्या भाजप नेत्यांना तर खूपच मर्यादा आहेत. बिहारमधून जनतेने नरेंद्र मोदींच्या नावावर खासदार निवडून दिल्याचा भाजप नेत्यांचा दावा असला तरी त्यात नितीशबाबूंचा खारीचा तरी वाटा आहे याचा विसर पडू नये इतकेच.

अरुणाचलमधील घुसखोरीचा दावा
जम्मू-कश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम रद्द करून सरकारने पाकिस्तानची आणि कश्मीरमधील बंडखोरांची खुमखुमी जिरवली असली तरी देशभक्ती आणि देशप्रेमाच्या माहोलातून खडबडून जागे करणारी बातमी आली आहे ती ‘चिनी ड्रगन’ची कायमच तिरकी नजर असलेल्या अरुणाचल प्रदेशातून. देशात मंदी आहे असे म्हणणाऱयांना सध्या देशद्रोहाचा शिक्का मारून अडगळीत टाकले जात आहे. मात्र अरुणाचलमध्ये चीनने घुसखोरी केल्याचा दावा करणारे दुसरे तिसरे कोणी नसून भाजपचेच खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोही असल्याचा शिक्का मारावा तरी कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अरुणाचलच्या एंजाव जिह्यात चगलमग सर्कलमध्ये घुसखोरी करून चिनी सैन्याने कियोमरू नाल्यावर एक पूल बनविल्याचा दावा करत स्थानिक भाजपचे खासदार तपिर गाओ यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. एकीकडे पाकव्याप्त कश्मीर आणि बलुचिस्तानही ताब्यात घेऊ वगैरे, अशा उन्मादी डरकाळ्या प्रचारकी थाटांत फोडल्या जात असताना चिनी ड्रगनने केलेल्या घुसखोरीकडे सरकारने गांभीर्याने पाहायला हवे. स्थानिक खासदार गंभीर तक्रार करत असताना सैन्यदलाने मात्र अशी चिनी घुसखोरी झालेली नाही असा दावा केला आहे. चिनी ड्रगन डोकलाम आणि परिसरात सातत्याने घुसखोरीच्या कारवाया करत आहे. त्याकडे डोळेझाक करता येणार नाही. हिंदुस्थानला सर्वाधिक धोका पाकिस्तानपेक्षा चीनकडून आहे. 370 व्या कलमाचा आनंदोत्सव उरकला असेल तर सरकारने अरुणाचलमधील या घुसखोरीच्या दाव्याकडे गंभीरपणे पाहायला हवे.

राव यांना ‘भारतरत्न’ द्या!
भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी हे बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. कोणताही आणि कोणाचाही मुलाहिजा न ठेवता स्वामी सडेतोडपणे बोलत असतात. प्रसंगी आपल्याच सरकारचे कान उपटायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत. देशाला आर्थिक उदारीकरणाची भेट देणारे व नवी अर्थक्रांती आणणारे माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांना मोदी सरकारने ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या जसा मंदीबाईचा फेरा देशावर आला आहे त्यापेक्षाही देशाची परिस्थिती 1990 च्या सुरुवातीस गंभीर होती. अवघ्या 21 दिवसांचा चलनसाठा शिल्लक होता आणि देशाचे सोने गहाण ठेवलेले होते. नरसिंह राव यांनी देशाला फक्त या आर्थिक आरिष्टातून बाहेर काढले नाही तर एक उंची मिळवून दिली. आज आपला देश जो काही महाशक्ती वगैरे म्हणून उदयास येत आहे त्याचे निःसंशय श्रेय या नरसिंह राव यांचेच. मात्र दुर्दैवाने त्यांना आर्थिक उदारीकरणाचेही श्रेय मिळाले नाही आणि त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीचेदेखील. किंबहुना ते चंद्रास्वामी व जैन डायरीसाठी लक्षात राहतील असेच प्रयत्न केले गेले. काही विद्वानांनी आर्थिक उदारीकरणाचे श्रेय मनमोहन सिंग यांना दिले, मात्र नरसिंह राव यांच्यावर अन्याय केला. वास्तविक, नरसिंह राव हेच आर्थिक उदारीकरणाचे जनक आहेत. त्यांनीच मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री बनवले. मनमोहन अर्थशास्त्रातले विद्वान निःसंशय आहेत, मात्र देश कठीण परिस्थितीतून जात असताना तुमच्या राजकीय नेतृत्वाची कसोटी लागत असते. त्यावेळी नरसिंह राव यांनी देशाला एक मजबूत नेतृत्व दिले आणि मनमोहन सिंग यांना पूर्ण मोकळीक. अर्थात दुर्दैवाने नरसिंह राव यांचा पाठलाग मृत्यूनंतरही सोडला नाही. काँग्रेस नेत्यांच्या विरोधामुळे या माजी पंतप्रधानांचे पार्थिवही 24 अकबर रोड या काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यास मज्जाव करण्यात आला. दिल्लीत तुलनेने सामान्य नेत्यांची स्मृतिस्थळे आहेत, मात्र नरसिंह राव यांना मृत्यूनंतरही हा सन्मान मिळाला नाही. काँग्रेसने केलेली चूक भाजप सरकार सुधारणार काय, हाच खरा प्रश्न आहे.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या